बिलोली पंचायतसमिती पोटनिवडणुकीत सुरेखा खिरप्पावार विजयी; कॉंग्रेसला जागा राखण्यात यश
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 7, 2018 12:35 PM2018-04-07T12:35:39+5:302018-04-07T12:35:39+5:30
बिलोली पंचायत समितीच्या सगरोळी गणाच्या पोटनिवडणुकित कॉंग्रेसच्या सुरेखा खिरप्पावार विजयी झाल्या.
नांदेड : बिलोली पंचायत समितीच्या सगरोळी गणाच्या पोटनिवडणुकित कॉंग्रेसच्या सुरेखा खिरप्पावार विजयी झाल्या. अत्यंत चुरशीच्या झालेल्या या लढतीत त्यांनी भाजपच्या सतीश गौड यांचा केवळ ८८ मतांनी पराभव केला. यासोबतच कॉंग्रेसने या गणातील आपले वर्चस्व कायम राखले.
सगरोळी गणातील कॉंग्रेसचे व्यंकटराव खिरप्पावार यांचे निधन झाल्याने येथे पोटनिवडणुक झाली. कॉंग्रसने या निवडणुकीसाठी त्यांच्या पत्नी तथा माजी जिल्हा परिषद सदस्य सुरेखा खिरप्पावार यांना उमेदवारी दिली. व्यंकटराव यांच्या जाण्याने निर्माण झालेली सहनाभूतीची लाट व जिल्हा परिषदेचा सगरोळी गट कॉंग्रसच्या ताब्यात असल्याने ही लढत त्यांना सोपी जाईल आधी चर्चा होती. मात्र, ही लढत अत्यंत चुरशीची झाली आणि केवळ ८८ मतांनी सुरेखा खिरप्पावार यांनी विजय मिळवला. त्यांना एकूण २९३० तर त्यांचे प्रतिस्पर्धी भाजप उमेदवार सतीश गौड यांना २८४२ मते मिळाली.
या विजयाने कॉंग्रसने ही जागा राखण्यात यश मिळवले. यासोबतच बिलोली पंचायत समितीमध्ये महिला सदस्यांची संख्या ५ झाली आहे. ८ सदस्यीय पंचायत समितीमध्ये भाजपचे ५ तर कॉंग्रेसचे ३ सदस्य आहेत.