नांदेड : इयत्ता दहावी परीक्षेत बिलोली तालुक्यातील कुंडलवाडी हायस्कूलचा शून्य टक्के निकाल लागला आहे़ शिक्षकांचा कामचुकारपणा आणि कर्तव्याकडे झालेले दुर्लक्ष यामुळेच येथे विद्यार्थ्यांचे नुकसान झाल्याचे सांगत संबंधित शिक्षकांवर कठोर कारवाई करण्याची मागणी जिल्हा परिषद सदस्यांनी लावून धरल्यानंतर कुंडलवाडी शाळेतील संबंधित सर्व शिक्षकांना निलंबित करण्याचा ठराव सोमवारी झालेल्या स्थायी समितीच्या बैठकीत घेण्यात आला़जिल्हा परिषद अध्यक्षा शांताबाई जवळगावकर यांच्या अध्यक्षतेखाली सोमवारी समितीची बैठक पार पडली़ या बैठकीला सभापती शीला निखाते, मधुमती कुंटूरकर, दत्तु रेड्डी, माधवराव मिसाळे यांच्यासह जि़ प़ सदस्य बाळासाहेब रावणगावकर, पूनम पवार, संजय बेळगे, विजय धोंडगे, रामराव नाईक आदींची उपस्थिती होती़ जिल्हा परिषद सदस्य संजय बेळगे यांनी कुंडलवाडी शाळेचा प्रश्न उपस्थित केला़ केवळ शिक्षकांच्या हलगर्जीपणामुळेच या शाळेतील विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान झाले आहे़ शाळेतील एकही विद्यार्थी उत्तीर्ण होत नसेल तर यास संबंधित शिक्षकांना जबाबदार धरले पाहिजे़ आणि त्यांच्यावर योग्य ती कारवाई झाली पाहिजे, अशी मागणी त्यांनी केली़ ही मागणी इतर सदस्यांनीही उचलून धरल्यानंतर सदर शाळेतील संबंधित सर्व शिक्षकांना निलंबित करण्याचा ठराव समितीने घेतला़अभियोक्तांच्या निवडीविषयी निविदाचे कारण पुढे करीत प्रशासनाकडून वेळकाढूपणा केला जात आहे़ या प्रकारामुळेच जिल्हाभरातील नवीन घरकुलांची कामे ठप्प झाल्याचा मुद्दा जि़ प़ सदस्य रामराव नाईक यांनी उपस्थित केला़ यावेळी निवड प्रक्रियेसाठी प्रशासनाकडून टोलवाटोलवी केली जात असल्याचे सांगत, घरकुला- संबंधीची सर्व प्रक्रिया पूर्ण करून घरकुल कामांना गती देण्याची मागणी करण्यात आली़ दरम्यान, या बैठकीत भोकर तालुक्यातील पायाळ धरणाचा मुद्दा बाळासाहेब रावणगावकर यांनी उपस्थित केला़ पायाळ येथील धरण अवघ्या दोन वर्षांत फुटले़ यासंबंधीचा चौकशी अहवाल प्रशासनाकडे प्राप्त झाला आहे़ त्यामुळे अहवालात ठपका ठेवलेल्या अधिकारी, कंत्राटदाराविरूद्ध कारवाई करण्याची मागणी त्यांनी केली़ यावर संबंधिताविरूद्ध कारवाई करण्याचा शब्द जि़ प़ अध्यक्षा शांताबाई जवळगावकर यांनी दिला़जिल्हा परिषद प्रशासनाच्या वतीने राष्ट्रीय पेयजल योजनेअंतर्गत गावांची निवड करून याबाबतचा प्रस्ताव सादर करण्यात आला होता़ मात्र, या प्रस्तावात काही त्रुटी असल्याचे आढळून आले आहे़ त्यामुळे या त्रुटींची पूर्तता करून नव्याने प्रस्ताव सादर करण्याचा निर्णयही या बैठकीत घेण्यात आला़ बैठकीला अधिकाऱ्यांचीही उपस्थिती होती.शंकरराव चव्हाण जन्मशताब्दीनिमित्त वृक्षारोपणमाजी गृहमंत्री तथा नांदेडचे भूमिपुत्र कै़डॉ़शंकरराव चव्हाण यांचे जन्मशताब्दी वर्ष १४ जुलै रोजी सुरु होत आहे़ यानिमित्ताने जिल्ह्यातील प्रत्येक ग्रामपंचायतीत डॉ़चव्हाण यांची जयंती साजरी करण्याचा निर्णय घेण्यात आला़ याबरोबरच जन्मशताब्दी वर्षानिमित्त जिल्ह्यातील प्रत्येक गावात वृक्षारोपण कार्यक्रम घेण्याचे स्थायी समितीच्या बैठकीत निश्चित करण्यात आले़ दरम्यान, जिल्हा परिषदेच्या नादुरुस्त वर्गखोल्यांसाठी डीपीसी मधून १८ कोटींचा निधी मंजूर करून घेतल्याबद्दल आ़अमिताताई चव्हाण यांच्या अभिनंदनाचा ठरावही स्थायी समितीने एकमताने घेतला़
शिक्षकांना करणार निलंबित
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 09, 2019 12:28 AM
इयत्ता दहावी परीक्षेत बिलोली तालुक्यातील कुंडलवाडी हायस्कूलचा शून्य टक्के निकाल लागला आहे़ शिक्षकांचा कामचुकारपणा आणि कर्तव्याकडे झालेले दुर्लक्ष यामुळेच येथे विद्यार्थ्यांचे नुकसान झाल्याचे सांगत संबंधित शिक्षकांवर कठोर कारवाई करण्याची मागणी जिल्हा परिषद सदस्यांनी लावून धरल्यानंतर कुंडलवाडी शाळेतील संबंधित सर्व शिक्षकांना निलंबित करण्याचा ठराव सोमवारी झालेल्या स्थायी समितीच्या बैठकीत घेण्यात आला़
ठळक मुद्देकुंडलवाडी शाळा : स्थायी समितीच्या बैठकीत घेतला ठराव