नांदेड: चारित्र्यावर संशय घेवून पती आणि सासूने डोक्यात वार करून विवाहितेचा निर्घृण खून केल्याचे उघडकीस आले आहे. ही घटना ५ जून रोजी पहाटे चार वाजेदरम्यान नांदेड तालुक्यातील फत्तेपूर (लालवाडी) शिवारातील धुत यांच्या आखाड्यावर घडली. अनुराधा संभाजी नोटके असे मृत विवाहितेचे नाव आहे.
संभाजी शिवाजी नोटके व त्यांची पत्नी अनुराधा संभाजी नोटके हे फत्तेपूर शिवारातील कैलास धुत यांच्या शेतातील आखाड्यावर 'सालगडी' म्हणून काम करीत होते. येथील शेतात नोटके पत्नी अनुराधा, आई शांताबाई शिवाजी नोटके, ११ वर्षीय मुलगा तुषार व आठवर्षीय मुलगी नोटके यांच्यासह राहत. दरम्यान, शेतातील काम करण्यावरून आणि चारित्र्यावर संशय घेऊन पती आणि सासू अनुराधास त्रास देत. या त्रासाबद्दलची माहिती अनुराधाने आई व भावाला अनेकवेळा दिली.
एवढेच नव्हे, त्रासाला कंटाळून अनुराधा काही दिवसांपूर्वी माहेरी आली होती. यावेळी अनुराधास त्रास न देण्याच्या अटीवर संभाजीने पुन्हा घरी परत नेले. दरम्यान, रविवारी पहाटे पती आणि सासूने अनुराधाचा डोक्यात वार करून खून केला. याप्रकरणी मृत अनुराधाचा भाऊ विश्वनाथ संभाजीराव हुंजे (रा. शिंगारवाडी ता. भोकर जि. नांदेड) यांनी दिलेल्या तक्रारीवरून पती संभाजी नोटके व सासू शांताबाई नोटके यांच्याविरूद्ध खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी पोलीस निरीक्षक अशोक घोरबांड यांच्या मार्गदर्शनाखाली पोउपनि. माणिक हंबर्डे आणि अंमलदार शेख उमर अधिक तपास करत आहेत.