हदगाव (नांदेड): चारित्र्याच्या संशयावरून पत्नी आणि १७ वर्षीय मुलाचा खून करून आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना आज तालुक्यातील टाकराळा गावाजवळील जंगलात उघडकीस आली (husband commit suicide after killing wife and children) . निर्जनस्थळी झालेली ही थरारक घटना तब्बल १५ दिवसांनंतर एका लाकुडतोड्यामुळे रविवारी उघडकीस आली. शांताराम कावळे ( ४० ), सीमा ( ३५ ) व सुजित ( १७ ) अशी मृतांची नावे असून ते हिमायतनगर तालुक्यातील टेंभी येथील रहिवासी असल्याची माहिती आहे.
शांताराम कावळे हा पत्नी सीमा, मुलगा सुजित व एका गतिमंद मुलगा यांच्यासह मुंबईला राहत असे. परंतु, लॉकडाऊनपासून शांताराम कुटुंबासह हिमायतनगर तालुक्यातील टेंभी येथील मुळगावी आला होता. येथेच मिळेल ते काम करून कावळे कुटुंब उदरनिर्वाह करत असे. दरम्यान, शांतारामच्या डोक्यात पत्नीच्या चारित्र्यावरून संशय निर्माण झाला. यातून त्यांचे टोकाचे वाद होत असत. २८ नोव्हेंबरला शांतारामने पत्नी आणि मुलाला मुंबईला जायचे असल्याचे सांगून टेंभी येथून बाहेर आणले. हदगाव तालुक्यातील टाकराळा गावापासून ३ किमी अंतरावर असलेल्या जंगलात निर्जनस्थळी शांताराम याने पत्नी आणि मुलाचा धारदार शस्त्राने वारकरून खून केला. त्यानंतर त्याने स्वतःही आत्महत्या केली.
दरम्यान, रविवारी दुपारी टाकराळा येथील एक लाकुडतोड्या जंगलात गेला असता त्याला सुन्न करणारे हे दृष्य दिसले. त्याने वनविभाग व तामसा पोलीसांना याची माहिती दिली. सायंकाळी पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन पाहणी केली असता शांतारामचा मृतदेह गळफास घेतलेल्या तर पत्नी आणि मुलाचा मृतदेह वार केलेल्या अवस्थेत असलेला आढळून आला. तब्बल १५ दिवसानंतर मृतदेह आढळून आल्याने ती कुजून गेली आहेत. यामुळे उत्तरीय तपासणी जागेवरच करण्यात आली. शांताराम याचा गतिमंद मुलगा नातेवाईकांकडे असल्याने बचावला. शांताराम याच्या नातेवाईकांनी आज जंगलात येऊन तिन्ही मृतदेहांवर तिथेच अंत्यसंस्कार केले आहेत.