विष्णूपुरी मूलभूत सुविधांचा अभाव
नांदेड- विष्णूपुरी येथील नवी आबादी भागातील नागरिकांसाठी मूलभूत सुविधा उपलब्ध करून देण्याची मागणी रिपब्लिकन सोशालिस्ट पार्टीने जिल्हाधिकारी यांना निवेदन देऊन केली आहे. या वसाहतीत बहुतांश मजूर वर्ग राहतो. या नागरिकांना आतापर्यंत घरकुल, पाणी, लाईट, रस्ते, नाली या मूलभूत सुविधा मिळाल्या नाहीत. निवेदनावर नाथा कांबळे, दयानंद गायकवाड, सूर्यकांत चौंदते, वंदनाबाई जाधव, नामदेव बुद्धे, गयाबाई चव्हाण, सरस्वतीबाई बारसे, आदींच्या सह्या आहेत.
ऑटोचालकांचा बेशिस्तपणा वाढला
नांदेड- शहरातील मुख्य रस्त्यावर काही ऑटोचालकांच्या बेशिस्तपणाचा फटका वाहतूक व्यवस्थेला बसत आहे. अनेकदा ऑटोचालक आपले वाहन रस्त्याच्या मध्यभागी अचानक उभे करून प्रवाशांना घेत आहेत. त्यामुळे वाहतूक कोंडी होऊन किरकोळ अपघात होत आहेत. कलामंदिर परिसर, श्रीनगर, वर्कशॉप, तरोडा नाका, आदी भागात ऑटोचालकांच्या बेशिस्तपणामुळे इतर वाहनधारकांना त्रास सहन करावा लागत आहे.
सिडकोतील पथदिवे बंद
नांदेड- महापालिका हद्दीत असलेल्या सिडकाे, हडको परिसरातील अनेक पथदिवे बंद असल्याने या भागात आंधाराचे साम्राज्य आहे. या अंधाराचा फायदा घेऊन भुरटे चोर सक्रिय झाले आहेत. रात्रीच्या वेळेस या मार्गाहून नागरिकांना ये- जा करणे भीतीदायक बनले आहे. मनपा प्रशासनाने पथदिवे सुरू करावेत, अशी मागणी नागरिकांनी केली आहे.
शिवशाहीचा प्रवास विनामूल्य
नांदेड- अधिस्वीकृतीधारक पत्रकारांना राज्य परिवहन महामंडळाच्या सर्वसाधारण व निमआराम बसेसबरोबरच शिवशाही बसने विनामूल्य प्रवास सवलत अनुज्ञेय करण्यात आली आहे. महाव्यवस्थापक यांनी विभाग नियंत्रकांना १३ जानेवारी रोजी एका पत्रान्वये कळविले आहे. शिवशाही बसमधून अधिस्वीकृतीधारक पत्रकारांना विनामूल्य प्रवासाची सवलत देण्यात येत नाही, अशा तक्रारी राज्य परिवहन महामंडळाकडे प्राप्त झाल्या होत्या.
ड्रेनेज दुरुस्तीची असर्जन परिसरात मागणी
नांदेड- असर्जन परिसरातील क्रांतिनगर, जयभवानीनगर, जयप्रकाशनगर भागात अनेक ठिकाणी अत्यावश्यक सेवा सुविधांचा अभाव आहे. या भागातील ड्रेनेज दुरुस्ती, पाणी, नाल्या, पथदिवे, आदी सुविधा उपलब्ध करून देण्याची मागणी करण्यात आली आहे. यासंदर्भात महापालिका आयुक्तांना निवेदन देण्यात आले आहे. निवेदनावर आकाश चव्हाण, नेमीचंद भोकरे, शुभम गुरडे, धम्मपाल गोवंदे, शिवाजी गोडबोले, दिलीप वैद्य, शंकर उबाळे यांच्या स्वाक्षऱ्या आहेत.