- गोविंद टेकाळेअर्धापूर (नांदेड): चार ते पाच रूपये किलो भाव मिळत असल्याने टरबुज उत्पादक शेतकऱ्यांना मोठा आर्थिक फटका बसला आहे. अर्धापूर तालुक्यातील पांगरी येथील शेतकऱ्याने तर लागदिच्या खर्च सुद्धा निघत नसल्याने टरबूज पिकावर कोयता फिरवला आहे. यामुळे शेतात अक्षरश: टरबूजाचा चिखल दिसत होता.
अर्धापूर तालुक्यातील पांगरी येथील शेतकरी विठ्ठल बालाजी सोनवणे यांच्या गट नं.१०६ मध्ये तिन एकर क्षेत्रावर टरबूजाची लागवड केली आहे. यासाठी सरासरी दिड लाख रुपये खर्च केला. टरबूज लागवडीनंतर शेतकऱ्यांनी ३ महिने वेळोवेळी खते, औषधी, पाणी दिले. उत्पादनही भरपूर निघत आहे. परंतु, एप्रिल मे महिन्यात बाजारात टरबुजाची आवक मोठ्या प्रमाणात वाढल्याने कवडीमोल भाव मिळत आहे. दोन पैसे पदरात पडतील या आशेने लावलेल्या टरबूजांवर केलेला खर्चही निघत नाही. वाहतुकीचा खर्चही निघत नाही. बाजारात तर शेतकऱ्यांवर फुकट टरबूज देण्याची वेळ आली आहे. यामुळे हतबल शेतकरी सोनवणे यांनी टरबूज वेलींवर कोयता फिरवला.
शेतकऱ्यांना चांगल्या उत्पन्नाची अपेक्षा होती. मात्र सध्या बाजारात टरबूजाच्या दरात मोठी घसरण झाली आहे. व्यापाऱ्यांकडून टरबुजाला दोन ते चार रुपये प्रति किलोप्रमाणे दर मिळत आहे. यामुळे पन्नास ते साठ रुपये किमतीचे टरबूज केवळ पाच दहा रुपयांत विक्री होट आहे. कवडीमोल भावामुळे शेतकऱ्यांच्या हातात उत्पादन खर्चही पडत नाही. अनेक शेतकरी तर विक्रीकरिता आणलेले टरबूज बाजारात तसेच सोडून घरी परतले. अशी बिकट परिस्थिती उत्पादक शेतकऱ्यांची झाली आहे. यासोबतच खरबूज, काकडी आदी पिके कमी दराने विक्री होत असल्याने शेतकऱ्यांच्या पदरात निराशा आली आहे.
बाजारपेठेत व्यापाऱ्यांचीच चलतीव्यापारी बांधावर येऊन मनमानी भावाने टरबूज माल मागत आहेत. स्वतः शेतकऱ्याने टरबुज बाजारात नेले तरीही आडतीमधील व्यापारी कमी भावात माल खरेदी करत आहेत. ही शेतकऱ्यांची थट्टा आहे. लागवडीचा खर्च सुद्धा निघाला नाही. आता पुढील पेरणीचा खर्च कसा भागवायचा हा प्रश्न आहे.- विठ्ठल सोनवणे (शेतकरी), पांगरी ता. अर्धापूर