नांदेड : कोरोनाच्या महामारीत सर्वाधिक ताण हा फ्रंटलाइन वर्कर्सवर येत आहे. कोरोनामुळे अनेकांचा मृत्यूही झाला आहे. गेल्या दीड वर्षापासून सातत्याने कोविडच्या ड्युटीवर असल्याने आरोग्य आणि पोलीस कर्मचाऱ्यांचे मानसिक स्वास्थ्य बिघडत चालले आहे. त्यामुळे पुरेशी झोप, संतुलित आहार अन् सकारात्मक मानसिकता ठेवून मानसिक थकवा दूर करता येणार आहे.
कोरोना महामारी लढाईत समोर असल्यामुळे पोलीस आणि आरोग्य कर्मचाऱ्यांना त्याचा सर्वाधिक धोका आहे. कामाचा ताण जास्त असल्याने शारीरिक आणि मानसिक थकवा त्यांना जाणवतो. हा थकवा दूर करण्यासाठी त्यांना सुट्याही मिळत नाहीत. याचदरम्यान काही अघटित घडले, तर त्याचा सर्व दोष या कर्मचाऱ्यांवर येतो. यासह इतर कारणांमुळे हे कर्मचारी कायम तणावाखाली काम करतात. त्यांचे शरीर आणि मन या महामारीच्या काळात सदैव निघण्याच्या तयारीत असल्यामुळे अस्थिर अवस्थेत असतात. त्यामुळे डोकेदुखी, पाठदुखी, मानदुखी, चिडचिडेपणा, झोप न लागणे, हाता-पायाला घाम येणे, भूक कमी होणे यासारख्या व्याधी होऊ शकतात.
मानसोपचार तज्ज्ञांचा कोट
कर्तव्यावर जाताना सकारात्मक मानसिकता ठेवा. घरी परतल्यानंतर डोळे मिटून दीर्घ श्वास घेणे आणि आपले ध्यान श्वासावर केंद्रित करणे. बॉडी स्कॅनिंग- डोळे मिटून, निपचित पडून डोक्याच्या केसांपासून पायाच्या नखांपर्यंत आपले ध्यान एकेका अवयवावरून फिरविणे. आळीपाळीने स्नायू शिथिल करणे- आपल्या शरीरातील एकेक स्नायू आळीपाळीने आखडून शिथिल करीत जाणे. कामाच्या ठिकाणी घडणाऱ्या नकारार्थी गोष्टी, जसे रुग्णाचा मृत्यू, व्यवस्थेतील अनागोंदी किंवा इतर गोष्टी, ज्या आपल्या नियंत्रणात नसतात, त्याचा परिणाम आपल्या मनावर होऊ देऊ नका. कामाच्या ठिकाणी मैत्रीचे, आनंदाचे वातावरण ठेवणे. एकत्र जेवण करणे, थट्टा-मस्करी, विनोद करणे या गोष्टींमुळे मानसिक थकवा दूर होतो. टोकाचा शारीरिक थकवा जाणवत असेल तर थोडा आराम करावा. जेणेकरून त्याचा निचरा होऊन तुम्ही परत काम करू शकता. पुरेशी झोप, संतुलित आहार आणि व्यायाम करणे आवश्यक आहे. कुटुंबातील सदस्यांनीही या काळात या फ्रंटलाईन वर्करना मदत करण्याची गरज आहे. घरातील कोणत्याही कारणामुळे त्यांच्या मानसिक ताणात भर पडणार नाही याची काळजी घ्यावी. यासारखे उपाय केल्यास फ्रंटलाईन कर्मचाऱ्यांवरील मानसिक ताण सहज दूर करता येतो.
- डॉ. रामेश्वर बोले, मानसोपचार तज्ज्ञ