लोकमत न्यूज नेटवर्क
किनवट - राष्ट्रीय आरोग्य अभियानांतर्गत गोकुंदा उपजिल्हा रुग्णालयात चार दिवसीय मोफत वैद्यकीय व दंत महाआरोग्य शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. अशाप्रकारचे शिबिर मंडलनिहाय घेण्याच्या सूचना जिल्हाधिकारी डाॅ. विपीन इटनकर यांनी जिल्हा आरोग्य अधिकाऱ्यांना दिल्या आहेत.
गोकुंदा येथील शिबिराच्या पहिल्याच दिवशी दीड हजारांच्यावर रुग्णांची नोंदणी झाली. या शिबिराचे वैशिष्ट्य म्हणजे यावेळी हृदयरोग, मेंदूविकार व सिकलसेल या आजारांची तपासणी करण्यात आली. सर्व तज्ज्ञांनी हजेरी लावल्याने आदिवासी भागातील जनतेला याचा फायदा होणार आहे.
यावेळी मुख्य कार्यकारी अधिकारी वर्षा ठाकूर (घुगे), सहाय्यक जिल्हाधिकारी कीर्तिकिरण पुजार, शल्य चिकिस्तक डॉ. नीळकंठ भोसीकर, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. बालाजी शिंदे, सर्जन फुगारे, तहसीलदार उत्तम कागणे, गटविकास अधिकारी सुभाष धनवे, तालुका आरोग्य अधिकारी डॉ. संजय मुरमुरे, वैद्यकीय अधीक्षक डॉ. उत्तम धुमाळे आदी उपस्थित होते. ग्रामीण भागातील महिलांना आरोग्य सुविधा ग्रामीण भागात मिळाव्यात तसेच प्रसुती शासकीय रुग्णालयात व्हाव्यात, रेफर प्रथा बंद झाली पाहिजे, असे प्रतिपादन वर्षा ठाकूर (घुगे) यांनी केले. प्रास्ताविक वैद्यकीय अधीक्षक डॉ. उत्तम धुमाळे यांनी केले. सूत्रसंचालन उत्तम कानिंदे यांनी केले तर रामचंद्र ढोले यांनी आभार मानले. या शिबिराच्या यशस्वीतेसाठी डॉ. जुबेरी, विकास जाधव, डॉ. राजेंद्र लोंढे, डॉ. बालाजी तेलंग, डॉ. दत्ता केंद्रे, डॉ. सुनंदा भालेराव, डॉ. साबळे, डॉ. शिंदे, डॉ. बोडके, डॉ. तोटावार व कर्मचारी प्रयत्नशील आहेत.