पेट्रोल भाववाढीविरोधात रॅली
नांदेड : केंद्र सरकारच्या चुकीच्या धोरणामुळे पेट्रोल आणि डिझेलच्या किमती मोठ्या प्रमाणात वाढल्या आहेत. त्यामुळे सर्वसामान्यांचे बजेट बिघडले आहे. या विरोधात ११ जानेवारी रोजी चिखलवाडी कॉर्नर ते जिल्हाधिकारी कार्यालयापर्यंत निषेध रॅली काढण्यात येणार आहे, अशी माहिती राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष शे.रऊफ शे.पाशा जमीनदार यांनी दिली.
विहिरीतील पंप, वायर लांबविले
नांदेड- लोहा तालुक्यातील पार्डी येथील एका शेतातून चोरट्याने विद्युतपंप, वायर लंपास केला. ही घटना ७ जानेवारी रोजी घडली. शंकर माधवराव कानोडे यांच्या शेतातील विहिरीवरील २० हजार रुपये किमतीचे साहित्य लंपास करण्यात आले.या प्रकरणात लोहा पोलिस ठाण्यात गुन्हा नोंदविण्यात आला आहे.
चिखलवाडी येथे दारु पकडली
नांदेड- भोकर तालुक्यातील चिखलवाडी परिसरात एका बिअर शॉपीच्या पाठीमागे अवैधपणे ठेवण्यात आलेली दारु पोलिसांनी पकडली. या ठिकाणी साडे सहा हजार रुपये किमतीची विदेशी दारु ठेवण्यात आली होती. या प्रकरणात पोकॉ.राजू जंकुट यांच्या तक्रारीवरुन गुन्हा नोंदविण्यात आला आहे.
अपघातात जखमी तरुणाचा मृत्यू
नांदेड- शहरातील आसरानगर पाटीजवळ भरधाव वेगातील सफारी गाडीने दुचाकीस्वाराला धडक दिली होती. या अपघातात जखमी झालेल्या युवकाचा उपचारा दरम्यान मृत्यू झाला आहे. या प्रकरणात विमानतळ पोलिस ठाण्यात गुन्हा नोंद झाला.
आकाश राजेंद्र वर्मा रा.बंदाघाट हा तरुण २ जानेवारी रोजी आसरानगर पाटीजवळून जात असताना भरधाव वेगातील टाटा सफारी एम.एच.२६, एफ५५ ने आकाशच्या दुचाकीला धडक दिली होती. या अपघातात गंभीर झालेल्या आकाशला उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. या ठिकाणी त्याचा मृत्यू झाला. या प्रकरणात हितेश वर्मा यांनी दिलेल्या तक्रारीवरुन गुन्हा नोंदविण्यात आला आहे.