नांदेड : जिल्ह्यात अद्याप कोणत्याही वाळूघाटांचा लिलाव झाला नाही. परंतू त्यावर शक्कल लढवित वाळू बाहेर जिल्ह्यातून आणल्याचे पकडल्यानंतर सांगितले जात आहे. अशी अतिहुशारी करणाऱ्या एका वाळूमाफियाला मात्र ते चांगलेच महागात पडले. महसूलच्या पथकाने वाळू वाहनासह या माफियाला चक्क चंद्रपूरलाच पाठविले अन् सोबत एक कर्मचारी देऊन गुगलवरून लोकेशन टाकण्याची खबरदारीही घेतली. त्यामुळे ‘चार आण्याची कोंबडी अन् बाराण्याचा मसाला’ अशी त्याची अवस्था झाली. जिल्हाधिकाऱ्यांनी या वाळूमाफियाची चांगलीच खरडपट्टी काढली.
जिल्ह्यात वाळूघाटांचा लिलाव झाला नसला तरी, वाळूउपसा मात्र सुरूच आहे. काही जण तर इतर जिल्ह्यांतील पावत्यांचा त्यासाठी वापर करीत आहेत. एका महाभागाने तर चंद्रपूरला वाळू नेत असल्याचे महसूलच्या पथकाला सांगितले. त्यामुळे पथकही अवाक् झाले. त्यांनी वाळूच्या वाहनासह एक कर्मचारीच पाठविला. अन् ज्या ठिकाणी वाळू खाली करण्यात येईल त्या ठिकाणाहून मोबाइलद्वारे लोकेशन टाकण्यास सांगण्यात आले. त्यामुळे नाइलाजाने वाळूमाफियाला वाळूचा ट्रक घेऊन चंद्रपूर गाठावे लागले. त्यामुळे ‘चार आण्याची कोंबडी अन् बाराण्याचा मसाला’ अशी त्याची अवस्था झाली.
जिल्हाधिकाऱ्यांनी काढली खरडपट्टीवाळूमाफियाला सोमवारी जिल्हाधिकारी विपीन ईटणकर यांच्या समोर उभे केले. ईटणकर यांनी या वाळूमाफियाची चांगलीच खरडपट्टी काढली. नांदेड ते चंद्रपूरचे अंतर तीनशे किमीपेक्षा अधिक अंतर आहे. त्यासाठी लागणारे डिझेल किती, अशी प्रश्नांची सरबत्ती केली. चंद्रपूरला वाळूचा भाव हा केवळ सहाशे रुपये आहे. त्या ठिकाणी मोठ्या नद्या आहेत. मग, तू इथून कशी वाळू नेतो, असा सवाल केला. त्यावर वाळूमाफियाची बोबडीच वळाली.