बारुळ : कंधार तालुक्यातील बारूळ मंडळातील काटकळंबा व राऊत खेडा दोन सजाचा कारभार, सहा गावाचा कारभार एक तलाठी सांभाळत असून त्यामुळे संबंधित तलाठी एवढी गावे दिल्यामुळे इतर गावातली शेतकऱ्याचे कामे होत नसल्याच्या तक्रारी वाढत आहेत. त्यामुळे या मंडळातील कारभारावर वरिष्ठांचेही लक्ष नसल्यामुळे शेतकऱ्यांची कामे खोळंबली आहेत.
बारूळ मंडळात सहा सज्जा असून यामध्ये बारूळ, काटकळंबा, राऊत खेडा, चिखली, कवठा, मंगल सांगवी. तलाठी मात्र पाचच आहेत तर गावे सतरा आहेत. यातील काटकळंबा व राऊत खेडा या तलाठ्याकडे सहा गावे तर काही तलाठ्यांना तीन व दोन गावे आहेत. यातील काही तलाठ्यांच्या शेतकऱ्यांची कामे होत नसल्यामुळे गावातील नागरिकांनी बदलीसाठी ग्रामसभेतून तक्रारी करूनही बदल्या झाल्या नाहीत. त्यामुळे त्यांना अभय कुणाचे आहे हा प्रश्नही शेतकरी वर्गात पडला आहे. येथील संबंधित मंडळ अधिकारीही मंडळाकडे फिरकत नाहीत. त्यामुळे शेतकऱ्यांनाही संबंधित अधिकाऱ्यांना अडचणी सांगाव्यात कशा हा प्रश्न पडत आहे.
बारूळ मंडळातील तलाठ्याच्या अतिरिक्त गावामुळे तर काही तलाठी शेतकऱ्यांची कामे वेळेवर होत नसल्यामुळे शेतीची व विविध प्रमाणपत्राची कामे खोळंबली आहेत. तसेच अवैध खोदकाम हे या परिसरात मोठ्या प्रमाणात वाढत आहे. याच्यावर नियंत्रणही नाही. या उस्माननगर परिसरातून वाळू घाटकडून दररोज वाळू चोरी वाहने येत आहेत. वाळू माफिया व फलाटाच्या सहकार्यामुळे शासनाचे लाखो रुपये वाळू चोरी जात असल्याचे बिनधास्तपणे दिसत आहेत. तसेच महसूल वसुलीचे प्रमाणही कमी आहे. निवडणुकीच्या काळातील तलाठ्यांनी संबंधित राजकीय पुढाऱ्यांना हाताशी धरून साटेलोटे करून सोईस्कर वार्ड व मतदार याद्या तयार केल्या. मतदारांत व नागरिकांतही प्रचंड नाराजी याबाबत असूनही याकडे मात्र अधिकाऱ्यांचे लक्ष नसल्यामुळे जिल्हाधिकारी यांनी यावर नियंत्रण करावे अशी मागणी काँग्रेसचे तालुका उपाध्यक्ष मनोहर पाटील चिखलीकर यांनी केली आहे.