लोकमत न्यूज नेटवर्क
बी. व्ही. चव्हाण
उमरी : तालुक्यातील राजकीयदृष्ट्या महत्त्वाचे व सर्वाधिक लोकसंख्येच्या तळेगावात ग्रामपंचायत निवडणुकीच्या निमित्ताने देशमुख परिवारातील भाऊबंदकीचा वाद पुन्हा चव्हाट्यावर आला आहे. निवडणुका येतात जातात. मात्र, परिवारातील सख्य संबंध कायम राखले गेले पाहिजेत. किरकोळ कारणांवरून निर्माण झालेली कटुता दीर्घकालीन व पारंपरिक संघर्षात परिवर्तित होऊ शकते. हे टाळण्यासाठी दोन्ही बाजूंनी तेवढेच प्रयत्न होणे आवश्यक आहेत.
ग्रामपंचायत निवडणुकीत वर्चस्वाची लढाई सुरू झाली आहे. नोकरी-व्यवसायानिमित्त बाहेरगावी असलेले गावातील मूळचे रहिवासी ग्रामपंचायतीच्या राजकीय आखाड्यात उतरल्याने या निवडणुकीला आणखी रंग भरला आहे. ही निवडणूक स्थानिक विकासकामांच्या मुद्द्यावर लढविली जावी. ज्यातून आदर्श गावाची संकल्पना जनतेसमोर यावी. नागरी सोयी-सुविधांची पूर्तता व्हावी. हा मुख्य उद्देश असला तरी सध्या मात्र तळेगावात एकाच वाड्यात राहणाऱ्या देशमुख परिवारातील भाऊबंदकीतील वाद पुन्हा प्रचाराच्या भाषणातून जाहीररीत्या पुढे येत आहे. एकेकाळी टंचाईग्रस्त असणारे तळेगाव आजघडीला पाणीपुरवठ्याच्या बाबतीत स्वावलंबी झाले आहे. गेल्या पाच वर्षांत येथील पाणी योजना, ग्रामपंचायत कार्यालयाची अत्याधुनिक इमारत, सभागृहे अशी काही कामे येथे उभी राहिली आहे त्या परिस्थितीत समाधान मानणे कदापि शक्य नाही. यापेक्षाही गावाची प्रगती होण्याच्या दृष्टीने सर्वांनी प्रयत्न करणे. प्रगतीचे ध्येय डोळ्यांसमोर ठेवणे जरूरीचे आहे. १३ जागांसाठी होत असलेल्या या ग्रामपंचायत निवडणुकीत ३ अपक्षांसह एकूण २७ उमेदवार रिंगणात आहेत. विशेष म्हणजे अपक्ष उमेदवार हे निवृत्त कर्मचारी अथवा त्यांचे नातेवाईक यापैकी आहेत. साडेछत्तीस गावची वतनदारी असलेल्या दुर्मीळ अशा देशमुख परिवारातील ज्योतीताई विक्रम देशमुख व संतोषी सुरेशराव देशमुख या दोघी जाऊबाई वाॅर्ड क्रमांक २ मधून एकमेकींच्या विरोधात रिंगणात आहेत. येणाऱ्या सरपंचपदाच्या आरक्षणात संधी मिळण्याचे दोघींचेही उद्दिष्ट आहे. जाहीर झालेले आरक्षण कायम राहिल्यास हेही तेवढेच सत्य आहे. कुणीही आले तरी सरपंचपद मात्र देशमुखांच्या वाड्यातच जाणार. सर्वसामान्य लोकांना यात काय मिळणार? हा प्रश्न आता महत्त्वाचा ठरणारा आहे. त्यामुळे सर्वसामान्य लोकांनी अधिक संघर्षाच्या भूमिकेत न गेलेलेच बरे ! असाही सल्ला गावातील बुजुर्ग मंडळी तरुणांना देत आहेत. सर्वसामान्य कार्यकर्ते एकमेकांच्या विरोधात पेटून उठल्याचे चित्र सध्यातरी तळेगावात आहे. प्रचाराच्या कॉर्नर सभांतून ही स्थिती प्रकर्षाने दिसून येत आहे. अगदी याच्या उलट माजी आमदार बापूसाहेब देशमुख-गोरठेकर यांच्या गावात दिसून येते. ११ सदस्यसंख्येच्या गोरठा ग्रा. पं. निवडणूक आखाड्यात एका अपक्षांसह एकूण २३ उमेदवार आहेत. गोरठेकरांनी आपल्या परिवारातील एकाही सदस्याला या निवडणुकीत उतरविले नाही. सुरुवातीला असे प्रयत्न करणाऱ्यांना त्यांनी साफ फटकारले. उलटपक्षी गावातील सर्वसामान्य परिवारातील जातनिहाय एकेकाला उमेदवारीची संधी दिली. यातून परिवारवाद व एकाधिकारशाही संपुष्टात आली. हा मुख्य उद्देश डोळ्यांसमोर ठेवूनच गेल्या तीन टर्मपासून ही परंपरा जोपासली जात आहे म्हणून ग्रा. पं. निवडणुकीच्या निमित्ताने येथील वाद-विवाद, भांडणे पूर्णतः बाजूला सारण्यात नेते यशस्वी ठरले आहेत. गोरठा गावात कसलीच सभा नाही, बैठक नाही. उमेदवार व मतदार आपापल्या व्यक्तिगत कामांमध्ये व्यस्त आहेत. हे विशेष होय. उमरी तालुक्यातील गोरठेकरांचे नेतृत्व मानणाऱ्यांनी निदानपक्षी गोरठा पॅटर्नचा आदर्श आता प्रचारात तरी अंमलात आणावा, असे अपेक्षित आहे.