बाराहाळी ( नांदेड ) - आईशी फोनवरून बोलत असताना फोन कट करावयाचा विसर पडला अन् त्यावरील ‘तात्या, मी गावाकडे येणार नाही’, मयत मुलाचे हे शेवटचे वाक्य आईने ऐकले. अन् त्यामुळे सूर्यकांत नागनाथ जाधव या तरुणाच्या खुनाला वाचा फुटली. या वेळी काका मला वाचवा.. अशी दयायाचनाही मयत सूर्यकांतने केली होती. तब्बल महिन्याभरानंतर ही घटना उघडकीस आली असून, त्यामुळे ज्यांचा मुले म्हणून सांभाळ केला, त्याचाच खून पाडल्याचे पुढे आले आहे. परंतु खुनानंतरही आरोपी उजळमाथ्याने फिरून पोलिसांवरच दबावतंत्राचा वापर करीत होता.
मौजे हसनाळ येथे नागनाथ जाधव व आरोपी मारोती थोटवे हे मावसभाऊ राहत होते. नागनाथ जाधवला दोन मुले अन् एक मुलगी. मुलीचे लग्न झाले असून रविकांत आणि सूर्यकांत हे आईसोबत राहत हाेते. दहा वर्षांपूर्वी त्यांचे पित्याचे छत्र हरविल्याने माधव थोटवे यांनीच त्यांच्या कुटुंबाला आधार दिला होता. दोन्ही भाऊ जेसीबी ऑपरेटर म्हणून काम करीत होते. सर्व सुरळीत असताना माधव थोटवे आणि जाधव कुटुंबात आर्थिक देवाण-घेवाणीवरून वाद झाला. त्याला प्रेमप्रकरणाचीही किनार होती. या वादामुळे सूर्यकांत याने गाव सोडून सांगली जिल्हा गाठला. परंतु त्याच्याविषयीचा माधव थोटवेच्या मनातील राग तसूभरही कमी झाला नव्हता. सूर्यकांत याच्या मालकीची एक जेसीबी नरसी येथे होती. त्यामुळे जेसीबी नेण्यासाठी तो गावाकडे आला होता. उदगीर तालुक्यातील रावणकोळा येथे ३० ऑक्टोबर रोजी त्याने बहिणीकडे मुक्काम केला. त्यानंतर हसनाळ येथे आईची भेट घेऊन तो जेसीबी घेऊन जाणार होता. गावाकडे जात असतानाच आरोपी माधव थोटवे आणि त्याचा मेव्हणा पंढरी गवलवाड यांची गाठ पडली. या वेळी सूर्यकांत हा फोनवर आईशी बोलत होता. या वेळी त्याला फोन कट करण्याचा विसर पडला अन् त्याने तात्या मी गावाकडे येणार नाही, अशी विनवणी आरोपी मारोती थोटवे यांना केली.
हा शेवटचा संवाद त्याच्या आईने ऐकला. त्यानंतर फोन बंद झाला. त्यामुळे आईच्या मनातही शंकेची पाल चुकचुकली. त्यांनी गावातील प्रतिष्ठित मंडळींपुढे आपली भीती बोलून दाखविली. परंतु आरोपी थोटवे काही वेळातच गावात हजर झाला. पोलीस ठाण्यातही त्याने जाधव कुटुंबीयांवरच नाहक बदनामीचे आरोप केले. तसेच काही लोकांचा जमाव घेऊन मोर्चाही काढला होता. इकडे सूर्यकांतचा शोध लागत नसल्याने कुटुंबीय काळजीत होते. परंतु आरोपी मात्र कुठलाही सुगावा लागू देत नव्हते. अखेर एक महिन्यानंतर पोलिसांनी आरोपी माधव थोटवे आणि पंढरीनाथ गवलवाड यांच्या मुसक्या आवळून पोलिसी खाक्या दाखविला. त्यानंतर पोपटासारखा त्यांनी सर्व घटनाक्रम पोलिसांना सांगितला. सूर्यकांतच्या खुनावर प्रेत पुरल्याची जागाही दाखविली.
पोलिसांवरच दबावतंत्राचा वापर
आरोपी माधव थोटवे याच्याबाबत मयताच्या आईने पोलीस ठाण्यात तक्रार दिली होती. त्यानंतर आरोपीने ठाणे गाठून जाधव कुटुंब माझी बदनामी करीत असल्याचा आरोप केला होता. तसेच काही लोकांना घेऊन पोलिसांवर दबाव आणण्याचा प्रयत्न केला. त्यामुळे पोलिसांनाही खुनाचा उलगडा होत नव्हता. परंतु पोलिसी खाक्या दाखविताच आरोपींनी सूर्यकांतचा रावणगाव शिवारात खून करून मृतदेह पुरल्याचे पोलिसांना सांगितले.