कासराळी : येथील ग्रामपंचायत निवडणुकीसाठी नामनिर्देशनपत्र दाखल करून रिंगणात व बाहेर असलेल्या दोन्ही गटांतील जवळपास ४५ कुटुंबांतील व्यक्तींनी पात्रतेसाठी आवश्यक असलेल्या ग्रामपंचायतींच्या बेबाकीसाठी जवळपास दोन लाख रुपये मोजले आहेत. ज्यामुळे ग्रामपंचायतीच्या तिजोरी गल्ला भरला आहे.
निवडणुकीचा कार्यक्रम १५ जानेवारी रोजी असल्याचे जाहीर झाल्यानंतर इच्छुक उमेदवारांनी यासाठी तयारी चालविली. ग्रामपंचायतीचे खाते बेबाकी करणे ही अट असल्याने येथील ४५ कुटुंबीयांनी ग्रामपंचायतीचा आपला जुन्या कराचा हिशोब चुकता करून बेबाकी प्रमाणपत्र मिळविले. या ४५ कुटुंबीयांनी अधिकृतपणे एकूण एक लाख ८९ हजार १७० रुपये ग्रामपंचायतीचे कर भरून खाते बेबाक केले आहेत. यापैकी प्रभाग क्रमांक ३ मध्ये काँग्रेसतर्फे असलेल्या जयश्री शेषराव गजलोड यांना सर्वाधिक ४० हजार रुपये ग्रामपंचायतीने कर आकारणी केली आहे. कासराळीत सरळ सरळ या निवडणुकीकरिता गट असल्याने काँग्रेस समर्थक असलेल्या गटाने १४ उमेदवारांसाठी ८२ हजार रुपये कर भरल्याचा दावा केला; तर याउलट भाजप समर्थक गटाच्या जवळपास २६ कुटुंबांतील उमेदवारांचे एक लाख सात हजार रक्कम येथे आकारली आहे. कासराळीत एकूणच या निवडणुकीसाठी दोन्ही गटांचे मिळून ४३ कुटुंबीयांची एक लाख ८९ हजार १७० रु. कर आकारणी या ग्रामपंचायतीने केली व रीतसर ग्रामपंचायतीच्या बँक खात्यात जमा केली असल्याचे येथील ग्रामविकास अधिकारी डी. एल. वाघमारे यांनी सांगितले. मात्र एक लाख ८९ हजारांपैकी एका गटाच्या १४ कुटुंबीयांकडून ८२ हजार वसुली झाली असताना दुसऱ्या गटाकडून निवडणुकीसाठी नामनिर्देशन दाखल केलेल्या २७ कुटुंबांकडून उर्वरित वसूल झालेली रक्कम ही विसंगती दर्शविते.
एकूणच येथील निवडणुकीच्या निमित्ताने का होईना, येथील ग्रामपंचायतीची तिजोरी बेबाकीसाठी मिळालेल्या जवळपास दोन लाख रुपयांच्या वसुलीने तुडुंब झाली आहे.