मतदानाद्वारे दगाबाज भाजपाला धडा शिकवा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 8, 2018 12:19 AM2018-12-08T00:19:38+5:302018-12-08T00:22:28+5:30
अशा दगाबाज पक्षाला धडा शिकविण्याची संधी पालिका निवडणुकांच्या माध्यमातून लोहावासियांना मिळाली आहे. शेतकऱ्यांसह सर्वसामान्य नागरिकांची फसवणूक करणा-या भाजपाला धडा शिकवा, असे आवाहन माजी मुख्यमंत्री व प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष खा.अशोकराव चव्हाण यांनी आज येथे केले.
नांदेड : केंद्रातील आणि राज्यातील भाजपच्या कारभाराला जनता कंटाळली आहे. समाजातील सर्वच घटकाला या सरकारने दगा देण्याचे काम केले आहे. अशा दगाबाज पक्षाला धडा शिकविण्याची संधी पालिका निवडणुकांच्या माध्यमातून लोहावासियांना मिळाली आहे. शेतकऱ्यांसह सर्वसामान्य नागरिकांची फसवणूक करणा-या भाजपाला धडा शिकवा, असे आवाहन माजी मुख्यमंत्री व प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष खा.अशोकराव चव्हाण यांनी आज येथे केले.
लोहा नगरपालिका निवडणुकीतील भारतीय राष्ट्रीय काँग्रेस व भटक्या विमुक्त जाती महासंघ आघाडीचे अधिकृत उमेदवार यांच्या प्रचारार्थ येथील श्री संत गाडगे महाराज महाविद्यालयाच्या मैदानावर झालेल्या विराट सभेत ते बोलत होते. व्यासपिठावर माजी मंत्री आ.अब्दुल सत्तार, माजी मंत्री आ.डी.पी. सावंत, युवानेते धीरज देशमुख, माजी मंत्री आ.बस्वराज पाटील, आ.वसंतराव चव्हाण, आ.अमरनाथ राजुरकर, महापौर शीलताई भवरे, जिल्हाध्यक्ष गोविंदराव शिंदे नागेलीकर, प्रदेश सरचिटणीस बी.आर. कदम, माजी आ.रोहिदास चव्हाण, माजी आ.हणमंतराव पाटील बेटमोगरेकर, माजी आ.माधवराव पाटील जवळगावकर, माजी आ.रावसाहेब अंतापूरकर, माजी महापौर अब्दुल सत्तार, जि.प.चे माजी अध्यक्ष दिलीप पाटील बेटमोगरेकर, उपमहापौर विनय गिरडे पाटील, सभापती शमीम अब्दुल्ला, माजी महापौर अब्दुल सत्तार, तालुकाध्यक्ष माधवराव पांडागळे, रंगनाथ भुजबळ, माजी नगराध्यक्ष अरविंद नळगे, कल्याण सूर्यवंशी, माजी सभापती किशोर स्वामी, माजी सभापती संजय बेळगे, संजय देशमुख लहानकर, आनंद चव्हाण, विजय येवनकर, प्रशांत तिडके आदींची उपस्थिती होती.
पुढे बोलताना खा.अशोकराव चव्हाण म्हणाले की, जनसंघर्ष यात्रेच्या निमित्ताने सध्या मी संपूर्ण महाराष्ट्र पिंजुन काढत आहे. या सरकारने जनतेला वा-यावर सोडले आहे. त्यामुळे अच्छे दिनचे स्वप्न दाखविलेल्या भाजपाच्या काळात जनतेसाठी बुरे दिन आले आहेत. पण काळजी करू नका , येणारे सरकार काँग्रेस पक्षाचेच राहणार आहे. जनसंघर्ष यात्रेच्या माध्यमातून महाराष्टभर फिरत असताना वारे काँग्रेसच्या दिशेने वाहत असल्याचे स्पष्ट झाले आहे. येणा-या काळात महाराष्ट्राबरोबरच केंद्रातील सरकारही काँग्रेसचेच येणार आहे. त्यामुळे उद्या सर्वांगीन विकासासाठी लोहावासियांनी काँग्रेसच्या पाठीशी रहावे, आवाहन खा. चव्हाण यांनी केले.
नांदेड जिल्ह्यातील इतर तालुक्यांपेक्षा लोहा आणि कंधारची परिस्थिती वेगळी आहे. निष्ठा आणि विश्वास कशाला म्हणतात? हेच काहींना माहित नाही. अशा व्यक्ती या कधीच एका पक्षासोबत राहिलेल्या नाहीत. अशा दलबदलू लोकांना जागा दाखवून देण्याची संधी या निवडणुकीच्या माध्यमातून मतदारांना मिळाली आहे. केवळ लोहा नगरपालिकाच नव्हे तर आगामी विधानसभा निवडणूक आणि लातूर लोकसभा मतदारसंघ जिंकण्यासाठी पूर्ण ताकतीने काँग्रेससोबत रहा, असे आवाहनही त्यांनी केले.
माजी मंत्री आ.अब्दुल सत्तार, माजी मंत्री आ.डी.पी. सावंत, युवानेते धीरज देशमुख, माजी मंत्री आ.बस्वराज पाटील यांचीही यावेळी भाषणे झाली.
प्रारंभी सभेचे प्रास्ताविक नगराध्यक्षपदाचे उमेदवार सोनू संगेवार यांनी केले तर सुत्रसंचालन आणि आभार प्रवक्ते संतोष पांडागळे यांनी केले. यावेळी माजी सभापती मसुद खान, उमेश पवळे, सुनिल शेट्टे, बालाजी पांडागळे, संजय मोरे, राजू काळे, श्रीनिवास जाधव, फारूखअली खान, साबेर चाऊस यांची उपस्थिती होती.
पुढील सर्व निवडणुकात भाजपचे पाणीपत
कंधार-लोहा तालुक्यातील कामधेनु असलेला कलंबर सहकारी साखर कारखाना कोणी बंद पाडला? चंद्रपूर जिल्ह्यातील बंद पडलेली दारूची दुकाने नांदेड जिल्ह्यात कोणी सुरू केली? याची माहिती तुम्हा सर्व मतदारांना आहे. देशी दारूची दुकाने चालविण्याइतके सोपे काम साखर कारखाने चालविण्याचे नाही. त्यामुळे अशा नेत्यांना जनताच जागा दाखवून देईल. असे सांगतानाच शेतक-यांना स्वत:च चिता रचून त्यावर पेटवून घेवून आत्महत्या हत्या करण्याची वेळ या सरकारने आणली आहे. त्यामुळे आता हे सरकार घालविण्याचे काम लोहा नगरपालिकेच्या निवडणुकीतून तुम्ही करावे. देशात ज्या पाच राज्यांत आता निवडणुका झाल्या त्यामध्ये भाजपाचे पाणीपत दिसत आहे. त्याचीच पुनरावृत्ती लोह्यात करा असेही ते म्हणाले.