नांदेड : कधी काळी अर्धापूर तालुक्यातील जिल्हा परिषदेच्या विद्यार्थ्यांना शिक्षणाचे धडे देणारी ती आज त्याच अर्धापूर विभागात पोलीस उपअधीक्षक म्हणून समाजाचे रक्षण करण्याचे काम करतेय. मनातील जिद्द अन् आई, वडिलांच्या प्रोत्साहनातून अर्चना पाटील यांनी म्हणून शिक्षिका म्हणून महाराष्ट्र राज्य लोकसेवा आयोगाच्या माध्यमातून पोलीस उपअधीक्षक बनण्याचे स्वप्न पूर्ण केले.
पाटील कुटुंबीय मूळचे किनवट तालुक्यातील. नोकरीनिमित्त ते नांदेडात स्थायिक झाले. वडील दत्ता पाटील हे नांदेड महापालिकेत नोकरीला होते. अर्चना यांचे पहिली ते दहावीपर्यंत शिक्षण महात्मा फुले शाळेत झाले. पुढे हदगाव येथे डी.एड्. केले आणि अर्धापूर तालुक्यातील भाेगाव येथील जिल्हा परिषद शाळेत त्यांनी विद्यार्थ्यांना धडे देण्याचे काम केले. त्याचवेळी त्यांनी स्पर्धा परीक्षेची तयारी सुरूच ठेवली. २०१० मध्ये त्या राज्यसेवा परीक्षा उत्तीर्ण झाल्या. एप्रिल २०१३ मध्ये प्रशिक्षण पूर्ण करून सेवेत आल्या.
पोलीस उपअधीक्षक म्हणून काम करताना त्यांनी विधायक कामांना प्राधान्य दिले. लाचलुचपत प्रतिबंध विभागात उपअधीक्षक म्हणूनही जबाबदारी सांभाळली. अतिशय शांत, संयमी असलेल्या अर्चना पाटील यांनी वेळप्रसंगी गुन्हेगारी रोखण्यासाठी करारी बाणाही दाखवून दिला.
शेतकरी कन्या, शिक्षिका अन् आता ‘क्लास वन’ -शेतकरी कुटुंबात जन्मलेल्या रेखा काळम-कदम यांनी मेहनतीच्या जोरावर उपमुख्य कार्यकारी अधिकारी पदापर्यंत मजल मारली. डी.एड्.चे शिक्षण पूर्ण करून जिल्हा परिषद शाळेत ज्ञानदानाचे काम केले. मुंबई, नांदेडात सेवा देत असतानाही त्यांनी अभ्यास सुरू ठेवून आज त्या नांदेड जिल्हा परिषदेत उपमुख्य कार्यकारी अधिकारी म्हणून कार्यरत आहेत.