बदल्यांचा सुधारित शासन निर्णय ७ मेच्या निर्णयातील तरतुदीनुसार ७ पैकी ३ निकष पूर्ण करणाऱ्या शाळांचा अवघड क्षेत्रात समावेश करावा. किनवट व माहूर तालुके हे डोंगरी क्षेत्रात शंभर टक्के येतात. शासन निर्णय आदिवासी विभाग ९ मार्च १९९० नुसार माहूर तालुक्यातील ८५ टक्के व पूर्ण किनवट तालुका अंतर्गत क्षेत्रात येतो. व पोलीस अधीक्षक नांदेड यांनी २० मार्च २००४ च्या पत्रानुसार माहूर तालुक्यातील १४ गावे नक्षलग्रस्त म्हणून घोषित केलेली आहेत व वनपरिक्षेत्र अधिकारी माहूर यांनी तालुक्यातील ९२ शाळांना हिंस्र पशूंचा उपद्रव आहे, असे पत्रान्वये जिल्हा परिषदेला माहितीसुद्धा दिलेली आहे.
दोन्ही तालुक्यातील गावे राष्ट्रीय व राज्य महामार्गापासून १० किलोमीटरपेक्षा दूर आहेत. अनेक गावे संवाद छायेचा प्रदेशात येतात तर काही गावांमध्ये शासनाची कोणतीही सार्वजनिक वाहतूक व्यवस्था उपलब्ध नाही या सर्व बाबींचा पुनर्विचार करून जिल्हा अंतर्गत बदल्यासाठी अवघड क्षेत्राची सुधारित यादी जाहीर करण्यात यावी व पूर्वीची अवघड क्षेत्रातील गावे कायम ठेवण्यात यावीत, अशी मागणी महाराष्ट्र राज्य शिक्षक परिषदेचे राज्य कार्याध्यक्ष मधुकर उन्हाळे यांनी केली आहे. यासंदर्भात जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देण्यात आले. तसेच शिक्षणाधिकारी यांची भेट घेऊन सदर मागणी केली आहे. शिष्टमंडळात शिक्षक परिषदेचे जिल्हाध्यक्ष दत्तप्रसाद पांडागळे, बालाजी पापंटवार, व्यंकट गंदपवाड, दीपक गाढवे, तुकाराम पडिले, आगलावे एस. एन., आर. बी. बनसोडे, रमेश बनकर शिवाजी कवठेकर, बंडे डी. व्ही. इत्यादी माहूर व किनवट तालुक्यातील शिक्षक उपस्थित होते.