स्वारातीम विद्यापीठाला तसेच वरिष्ठ महाविद्यालयाला दर पाच वर्षांनी नॅकतर्फे मूल्यांकन करून घेणे आवश्यक असते. जेवढी नॅक मूल्यांकनामध्ये जास्त श्रेणी मिळेल तेवढे ते विद्यापीठ किंवा महाविद्यालय उच्च प्रतीचे समजले जाते. शिवाय शासनाकडून विकासासाठी जास्तीचा निधी उपलब्ध होत असतो. यादृष्टीने नॅक ही विद्यापीठासाठी खूप महत्त्वाची बाब असते. थोडक्यात मागील पाच वर्षांमध्ये विद्यापीठाने केलेल्या विकासात्मक बाबींचा लेखाजोखा यामध्ये असतो.
याबाबतची पूर्वतयारी म्हणून अनेक समित्यांची स्थापना करण्यात आली आहे. त्या-त्या समिती सदस्यांना त्यांची जबाबदारी ठरवून दिलेली आहे. त्यानुसार त्यांच्या बैठकीचे आयोजन करून आढावा घेण्यात येत आहे. मागील काही महिन्यांपासून कुलगुरू विद्यापीठातील संकुलांना स्वतः भेटी देऊन तेथील नॅक दृष्टीने आढावा घेत आहेत. नॅक पिअर टीम ही कोणत्याही संकुलास भेट देऊ शकते. तेथील संशोधन, मूलभूत सुविधा, फॅकल्टी इत्यादी बाबतीत पाहणी करणार आहे. विद्यापीठामध्ये कुलगुरू डॉ. उद्धव भोसले यांच्या मार्गदर्शनाखाली जलव्यवस्थापन, सोलार एनर्जी, कोविड-लॅब इत्यादीसारखी मोठी कामे झालेली आहेत. त्यामुळे विद्यापीठाला निश्चितच चांगली श्रेणी मिळेल, अशी आशा त्यांनी व्यक्त केली आहे. कुलसचिव डॉ. सर्जेराव शिंदे, नॅकचे मुख्य समन्वयक डॉ. डी. डी. पवार, वित्त व लेखा अधिकारी डॉ. डी. एम. खंदारे, आय.क़्यू.एसी. संचालक डॉ. व्ही. एन. लातूरकर, अधिष्ठाता डॉ. व्हि. एन. पाटील, अधिष्ठाता डॉ. एल. एम. वाघमारे यांच्या मार्गदर्शनाखाली विद्यापीठातील सर्व संचालक, प्राध्यापक, अधिकारी व कर्मचारी हे नॅकच्या तयारीसाठी परिश्रम घेत आहेत.