पूल ढासळल्याने वाहतूक बंद
इस्लापूर - अप्पारावपेठ जाणाऱ्या मार्गावरील पूल ढासळल्याने या भागातील तीनचाकी, चारचाकी वाहतूक बंद झाली आहे. या पुलाच्या दुरुस्तीची मागणी होत आहे. १२ जुलै रोजी अप्पारावपेठ, गोंडजेवली परिसरात मुसळधार पाऊस पडला. पावसाने नाल्याला पूर येऊन गोंडजेवली वननाक्याजवळील अप्पारावपेठजवळील पूल ढासळला.
विदेशी दारूची विक्री
बिलोली - सगरोळी येथे गेल्या अनेक महिन्यांपासून बनावट विदेशी दारूची विक्री होत असल्याची तक्रार वरिष्ठ अधिकाऱ्यांकडे करण्यात आली. स्थानिक पोलीस याकडे दुर्लक्ष करीत आहेत. शेजारील तेलंगणा येथील दारू सगरोळीत आणून विक्री केली जात आहे. काही बीअर शॉपीमधून दारूची बिनधास्त विक्री केली जात आहे.
अपघाताची शक्यता
नायगाव - तालुक्यातील गोदमगाव, हिप्परगा, कृष्णूर, बरबडा, वजिरगाव, टाकळी या रस्त्याचे काम गेल्या अनेक वर्षांपासून चालू-बंद अवस्थेत आहे. अर्धवट कामामुळे वाहनधारकांना आपला जीव मुठीत घेऊन प्रवास करावा लागत आहे. पावसामुळे कृष्णूर येथे पूर आला होता. त्यामुळे ये-जा करताना एक कार त्या नाल्यात अडकून पडली. सुदैवाने कारमधील प्रवासी सुखरूप होते.
पिके डोलू लागली
धर्माबाद - तालुक्यातील जारीकोट व परिसरात दमदार पाऊस झाल्यामुळे खरिपाची पिके डोलत आहेत. परिसरातील सायखेड, चोंडी, दिग्रस, रोशनगाव, चिकना, पाटोदा, मंगनाळी, चोळाखा, बेलगुजरी, आरेगाव, पिंपळगाव, सालेगाव, कारेगाव, आटाळा, यल्लापूर या परिसरात सर्वदूर पाऊस पडला आहे. पावसाने पिकांना जीवदान मिळाले.
खडकूत येथे वृक्ष लागवड
नांदेड - संत जगदीश बाबाजी महाराज गोशाळा खडकूत तसेच शंकर नागरी सहकारी बँक लि. व वृक्षमित्र फाउंडेशनच्या वतीने १२ जुलै रोजी खडकूत गोशाळेत वृक्ष लागवड करण्यात आली. याशिवाय आरोग्य शिबीर घेण्यात आले. कार्यक्रमास संत जगदीश बाबाजी, माजी खा.भास्करराव पाटील खतगावकर, जिल्हाधिकारी डॉ.विपीन इटनकर, तहसीलदार किरण अंबेकर आदी उपस्थित होते.
युनानी डॉक्टरांची पदे भरा
माहूर - येथील ग्रामीण रुग्णालयात युनानी डॉक्टरांची रिक्त पदे भरण्यात यावी अशी मागणी मनसेच्या वतीने करण्यात आली. युनानी वैद्यकीय अधिकारी पद गेल्या दोन ते तीन वर्षांपासून रिक्त असल्याने नागरिकांना युनानी सेवेपासून वंचित रहावे लागत आहे असे जिल्हाध्यक्ष रवी राठोड, तालुकाध्यक्ष विनोद सूृर्यवंशी, जिल्हा उपाध्यक्ष शेख आसिफ, विद्यार्थी तालुकाध्यक्ष गजानन कुलकर्णी यांनी नमूद केले.