दहावीतील विद्यार्थ्यांच्या पालकांना काय वाटते- १.दरवर्षी ज्या पद्धतीने परीक्षा होतात, त्याचप्रमाणे परीक्षा घेणे आवश्यक आहे. कारण मागील वर्षभर विद्यार्थ्यांना ऑनलाइन अभ्यासामुळे अनेक अडचणींना सामोरे जावे लागले. त्यामुळे ऑनलाइन परीक्षा घेतानाही अनेकांना या अडचणींचा सामना करावा लागला असता. - चंद्रप्रकाश गायकवाड, नांदेड
२. कोरोनाचा पुन्हा उद्रेक झाल्यामुळे सर्वत्र लॉकडाऊन लागणार की काय अशी परिस्थिती निर्माण झाली आहे. त्यातच आता दहावीच्या परीक्षा एप्रिल महिन्यात आहेत. त्यामुळे विद्यार्थ्यांना अशा वातावरणात परीक्षेला कसे पाठवायचे, याची भीती पालकांना आहे. - मनोहर कवडे, नांदेड.
३. विद्यार्थ्यांसाठी हे वर्षच खूप कठीण गेले आहे. यंदाचे शैक्षणिक वर्ष विद्यार्थ्यांची परीक्षा घेणारेच ठरले आहे. सुरुवातीला ऑनलाइन पद्धतीने अभ्यासक्रम शिकविण्यात आला; परंतु ऑनलाइन पद्धतीमुळे अनेकांचे समाधान झाले नाही. तसेच अभ्यासक्रमही पूर्ण झाला नाही. - अशोक उफाडे
बारावीतील विद्यार्थ्यांच्या पालकांना काय वाटते.
१.परीक्षा केंद्रावर होणारी विद्यार्थ्यांची गर्दी तसेच आपल्याकडे असलेल्या सुविधांचा अभाव, यामुळे नक्कीच पालकांना भीती वाटत आहे. शहरातील सर्वच परीक्षा केंद्रावर विद्यार्थ्यांची मोठी गर्दी असते. आता कोरोनामुळे हे नियोजन कसे करणार, हा प्रश्न आहे. - गंगाधर गायकवाड, नांदेड
२. शाळांचे वर्ग तसेच खाजगी शिकवण्या बंद असल्याने विद्यार्थ्यांना स्वत:च अनेक कठीण वाटणारे प्रकरणे सोडवावी लागली. त्यामुळे परीक्षा कशाही झाल्या तरी विद्यार्थ्यांना त्या द्याव्याच लागणार आहेत. मात्र, विद्यार्थ्यांच्या सोयीसाठी लेखी परीक्षाच महत्त्वाच्या आहेत. - सीमा बुक्तरे, सिद्धांतनगर, नांदेड.
३. शिक्षणमंत्र्यांनी ऑफलाइन परीक्षा जाहीर केल्यामुळे विद्यार्थ्यांना नक्कीच दिलासा मिळाला आहे. कारण लेखी परीक्षेद्वारेच विद्यार्थ्यांची गुणवत्ता लक्षात येते. त्यामुळे जो निर्णय घेण्यात आला तो योग्यच आहे. विद्यार्थ्यांनी कोरोनाला न घाबरता परीक्षेला सामोरे जावे.- सुनील लोंढे