नायगाव (जि. नांदेड) :
छत्रपती शिवाजी महाराज यांच्यासाठी रायगड या अभेद्य किल्ल्याची बांधणी करणाऱ्या हिरोजी इंदुलकर यांनी दाखविलेल्या राजनिष्ठेचे उदाहरण बुधवारी येथे देऊन राहुल गांधी यांनी निष्ठा काय असते, हे पटवून दिले. राहुल गांधी यांनी दिलेल्या या दाखल्याने उपस्थित अवाक् झाले.
राहुल गांधी यांच्या भारत जोडो यात्रेला सकाळीच सुरुवात होते. दिवसभर साधारणपणे २५ कि.मी. चालल्यानंतर रात्री मुक्काम केला जातो. सोबत असलेले ११८ भारतयात्री आाणि इतर कार्यकर्ते जेवण केल्यानंतर वेगवेगळ्या विषयांवर चर्चा करतात. या चर्चेमध्ये अनेक वेळेला राहुल गांधी हेसुद्धा सहभागी होतात.
दोन दिवसांपूर्वी ‘निष्ठा’ या विषयावरून चर्चा सुरू असताना त्यांनी थेट रायगडाचे उदाहरण दिले. अभेद्य रायगड किल्ला बांधणाऱ्या हिरोजी इंदुलकर यांनी फक्त एका पायरीवर नाव लिहिण्याची परवानगी मागितली होती. याला निष्ठा म्हणतात. हे ऐकताच यात्रेतील सहभागी सर्वजण अवाक् झाले.
विभूतीचेही पटवून दिले महत्त्व छत्रपती शिवराय यांच्याबद्दल त्यांनी अनेक उदाहरणेही दिली, अशी माहिती महाराष्ट्रातील भारतयात्रींनी दिली. ते म्हणाले, राहुल गांधी यांनी लिंगायत समाजात कपाळावर लावण्यात येणाऱ्या विभूतीचे महत्त्वही पटवून दिले. विभूतीत चमत्कारिक ताकद आहे, तसेच कपाळावर ती कुठेच जुळत नाही. द्वैत, अद्वैत, मनुस्मृती, संविधान याबाबतही राहुल गांधी यांचा अभ्यास दांडगा आहे. स्वामी विवेकानंद यांचे सुविचार तर त्यांना तोंडपाठ आहेत, असेही भारतयात्री म्हणाले.