किनवट : कृषी उत्पन्न बाजार समितीने चिखली फाटा येथे जिनिंग प्रेसिंगला खासगी परवानगी दिली़ मात्र,या कापूस खरेदी केंद्राकडे कापूस उत्पादक शेतक-यांनी पाठ फिरवली़ परिणामी सद्य:स्थितीत किनवट तालुक्यातील पांढरे सोने म्हणविल्या जाणारा कापूस तेलंगणातील आदिलाबाद येथे जात असल्याचे चित्र आहे़शहर व तालुक्यात अन्य खासगी व्यापारी आपले दुकान थाटून कापूस खरेदी करीत आहेत़ अशातच कवडी आणि पालापाचोळा निघाल्याचे कारण पुढे करून कापसाची कवडीमोल भावाने खरेदी करीत आहेत़ कापसाचा ५ हजार ४०० रुपये भाव असताना खासगी व्यापारी मात्र कवडी, पालापाचोळा असल्याचे सांगून ४ हजार ८०० रुपये या दराने खरेदी करीत आहेत़ प्रतिक्विंटल ६०० रुपयांचा चुना खासगी व्यापारी शेतक-यांना लावत असल्याचे दिसून येते आहे़ हा खरेदी केलेला कापूस तेलंगणातील आदिलाबाद येथे जात असल्याचे चित्र पहावयास मिळत आहे़किनवट तालुक्यात प्रामुख्याने कापूस हे नगदी पीक मोठ्या प्रमाणावर असताना शासनाने कापूस खरेदी केंद्र सुरू केलीच नाही़ याचा खासगी व्यापा-यांनी पुरेपूर फायदा घेऊन कापूस उत्पादक शेतक-यांचा कापूस आपल्या मर्जीप्रमाणे खरेदी करून लूट चालविली आहे़ एवढेच नाहीतर खासगी व्यापारी कापूस तोलाई करताना मापात पाप करीत आहेत़ मात्र वजनेमापे विभागाचे याकडे दुर्लक्ष होताना दिसत आहे़ कापूस पिकाचे उत्पादन मोठ्या प्रमाणावर घेतले जाते़ त्यामुळे या भागाला कापसाचा पट्टा म्हणून ओळखल्या जातो, असे असतानाही यावर्षी सरकारने शासकीय कापूस खरेदी केंद्र सुरूच न केल्याने हमी भावापेक्षा कमी भावाने खासगी व्यापा-यांनी शेतक-यांची लूट केली़ कापसाला केंद्र सरकारचा हमीभाव ५ हजार ४०० रुपये असताना या भागात मात्र ४ हजार ८०० रुपये व यापेक्षाही कमी भावाने खरेदी झाली़ म्हणून कापूस उत्पादक शेतक-यांना भावातील फरक म्हणून प्रतिक्विंटल पाचशे रुपये या साधारणपणे हेक्टरी २५ क्विंटल उतारा गृहीत धरून १२ हजार ५०० चे अनुदान देण्याची मागणी काँग्रेसचे तालुकाध्यक्ष सूर्यकांत रेड्डी यांनी केली आहे़चिखली केंद्रावर ३२ हजार ५०० क्विंटल कापूस खरेदीकिनवट कृषी उत्पन्न बाजार समितीने कापूस खरेदीसाठी चिखली फाटा येथील जिनिंग प्रेसिंगला परवानगी दिली़ आजपर्यंत येथे ३२ हजार ५०० क्विंटल कापूस खरेदी केला आहे़ यावर्षी दुष्काळी परिस्थिती असतानाही कृषी विभागाच्या अहवालानुसार जे उत्पन्न दर्शवले ते पाहता ५० हजार ७०७ हेक्टर क्षेत्रात साधारणपणे साडेतीन लाख क्विंटल कापसाचे उत्पन्न आले़ मग अशा परिस्थितीत जिनिंग प्रेसिंगवर कापूस उत्पादक शेतकरी आपला उत्पादित कापूस चिखली येथे विक्री केला नाही़ परिणामी या खरेदी केंद्राकडे शेतक-यांनी पाठ फिरवली असे चित्र आहे़
कापूस खरेदी केंद्राकडे शेतकऱ्यांची पाठ
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 21, 2019 12:43 AM
कृषी उत्पन्न बाजार समितीने चिखली फाटा येथे जिनिंग प्रेसिंगला खासगी परवानगी दिली़ मात्र,या कापूस खरेदी केंद्राकडे कापूस उत्पादक शेतक-यांनी पाठ फिरवली़
ठळक मुद्देकिनवट तालुका : पांढ-या सोन्याची तेलंगणातील बाजारपेठेत विक्री