लोकमत न्यूज नेटवर्कमुखेड/देगलूर : मागील चार वर्षांचा अनुभव पाहता हे सरकार ‘आवळा देवून कोहळा’ काढणारे थापाड्यांचे फसवणीस सरकार आहे. सर्वसामान्यांना वेठीस धरणाऱ्या या सत्ताधा-यांना आगामी काळात त्यांची जागा दाखवून द्या, असे आवाहन माजी मुख्यमंत्री तथा प्रदेश काँग्रेसचे अध्यक्ष अशोक चव्हाण यांनी केले. मुखेड येथे आयोजित विराट सभेत ते बोलत होते.मंचावर माजी मंत्री बाळासाहेब थोरात,हर्षवर्धन पाटील,नसीम खान, बस्वराज पाटील, राजू वाघमारे, आ. वसंत चव्हाण यांच्यासह हणमंतराव पाटील बेटमोगरेकर, रोहिदास चव्हाण, बाबूराव देबडवार, दिलीप पाटील बेटमोगरेकर, वैशालीताई चव्हाण यांच्यासह पदाधिकारी उपस्थित होते. तर देगलूर येथे झालेल्या सभेला माजी आ. रावसाहेब अंतापूरकर, नगराध्यक्ष मोगलाजी शिरसेटवार, शंकर कंतेवार, शिवाजीराव देशमुख, रामराव नाईक, अनिल पाटील खानापूरकर, जनार्दन बिरादार, दिनेश मुनगिनवार यांच्यासह पदाधिका-यांची उपस्थिती होती.केंद्रातील नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील सरकारवरही अशोकराव चव्हाण यांनी घणाघाती हल्ला चढविला. मोदी यांच्या सरकारमुळे देशाच्या संविधानाबरोबरच सर्वोच्च न्यायालय, निवडणूक आयोग या संस्था देखील आपली स्वायतत्ता गमावत असल्याचे सांगत मागील काही दिवसांपासून सर्वोच्च तपास यंत्रणा म्हणून ओळख असलेल्या सीबीआयमध्येही सरकारच्या हस्तक्षेपामुळे गोंधळाची स्थिती निर्माण झाल्याचे त्यांनी सांगितले. राज्यातील व देशातील कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न गंभीर झाला असून वाढती बेरोजगारी, शेतकरी आत्महत्या, इंधनाचे वाढलेले दर अशा ज्वलंत प्रश्नांकडे शासनाकडून कानाडोळा केला जात आहे. या प्रश्नांमुळेच शेतक-यांसह सर्वसामान्य जनता होरपळून निघत आहे. अशा सरकारला सर्वसामान्यांनी एकजुटता दाखवून आगामी निवडणुकात धडा शिकवावा, असे आवाहन खा. चव्हाण यांनी केले.समाजा-समाजात तेढ निर्माण करुन मतांची झोळी भरण्याचा या सरकारचा कुटील डाव आहे. एकीकडे छत्रपती शिवाजी महाराज यांचे नाव घ्यायचे आणि दुसरीकडे छिंदम सारखा भाजपाचा नगरसेवक शिवरायांची अवहेलना करतो, हेच भाजपा आ. राम कदम याच्या वक्तव्यावरुनही दिसून आले. सत्ताधारी पक्षातील हा आमदार मुलींना पळवून नेण्याची भाषा करतोच कसा ? असा सवाल करीत अशा निर्लज्ज लोकावर कारवाई करण्याऐवजी सत्ताधारी अशा लोकांची पाठराखण करीत आहेत, ही बाब दुर्दैवी असल्याचे ते म्हणाले.प्रारंभी माजी मंत्री बाळासाहेब थोरात यांनी माजी केंद्रीय गृहमंत्री शंकरराव चव्हाण तसेच माजी मुख्यमंत्री विलासराव देशमुख यांच्या कार्यकाळात मराठवाड्यात झालेल्या विविध विकासकामांचा आढावा घेतला. याबरोबरच हर्षवर्धन पाटील यांनीही अशोकराव चव्हाण मुख्यमंत्री असताना मराठवाड्यासह खानदेशच्या विकासासाठी घेतलेल्या विविध लोकोपयोगी निर्णयाची आठवण करुन दिली. सध्या दुष्काळाने मराठवाडा होरपळत असताना राज्य सरकार ठोस निर्णय घेण्याऐवजी चालढकल करीत असल्याचा आरोपही हर्षवर्धन पाटील यांनी केला. देगलूर येथील सभेपूर्वी माजी आ. रावसाहेब अंतापूरकर यांनी प्रास्ताविक केले. सभेला विराट जनसमुदाय उपस्थित होता.
थापाड्या सरकारला हद्दपार करा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 26, 2018 12:45 AM
लोकमत न्यूज नेटवर्क मुखेड/देगलूर : मागील चार वर्षांचा अनुभव पाहता हे सरकार ‘आवळा देवून कोहळा’ काढणारे थापाड्यांचे फसवणीस सरकार ...
ठळक मुद्देमुखेड, देगलूरमध्ये जनसंघर्षअशोक चव्हाण यांचा सेना-भाजपवर घणाघाती हल्ला