भोकर : शहरातील विद्यार्थी, नागरिकांची वाहतुकीच्या कोंडीतून सुटका करण्याच्या मागणीसाठी येथील एका प्राचार्यांनी १७ रोजी उपोषण करणार असल्याचा इशारा प्रशासनास दिला होता. याची धास्ती घेवून, प्रशासनाच्या वतीने १६ राजी रस्त्यावरील अतिक्रमणावर बुलडोझर चालवून अतिक्रमीत रस्ता मोकळा करण्याच्या कारवाईला सुरुवात केली आहे.
शहरांतर्गत दुतर्फा प्रशस्त रस्त्यांचा वापर वाहने उभी करण्यासाठी व विविध व्यवसायासाठी होत असल्याने, वाहतुकीची कोंडी होवून विद्यार्थी, वृध्द व महिलांना रस्त्यावरुन चालताना जीव मुठीत घेऊन चालावे लागत आहे. यातून सुटका व्हावी याकरिता येथील श्री शाहू विद्यालयाचे प्राचार्य संजय कामनगावकर यांनी मराठवाडा मुक्ती संग्राम दिनापासून उपोषणाला बसणार असल्याचा इशारा दिला होता. या आंदोलनाला विद्यार्थी, पालक आणि जनतेनेही पाठिंबा दर्शवल्याने, जन आंदोलन उभे राहिले. याची प्रशासनाने धास्ती घेवून आजपासून रस्त्यावरील अतिक्रमण काढण्यास सुरुवात केली. दरम्यान, काही व्यावसायिकांनी यास विरोधही करीत अडथळा निर्माण केला होता, अशांना पोलिसांनी ताब्यात घेतले. सदरील कारवाई तहसीलदार तथा नगर परिषद प्रशासकीय अधिकारी राजेश लांडगे, पो. नि. नानासाहेब उबाळे, महसूल प्रशासन व नगर परिषद कर्मचारी, महावितरण कर्मचारी आणि पोलिसांचा मोठा फौजफाटा तैनात होता.
मागील १५ वर्षात रस्त्यावरील अतिक्रमणे काढण्याचा चार वेळा प्रयत्न झाला. अतिक्रमण काढल्यानंतर पुन्हा परिस्थिती जैसे थे होत होती. आताही पूर्वीप्रमाणे अतिक्रमण वाढू नये अशी अपेक्षा नागरिक करीत आहेत. सदरील कारवाईत लहानसहान व्यावसायिकांचा रोजगार व पोटापाण्याचा प्रश्न निर्माण झाला आहे. यासाठीही उपाययोजना करावी अशी अपेक्षा व्यक्त होत आहे.