अर्धापूर ( नांदेड ): स्वर्गाची वाट ही बिकटच असल्याचा प्रत्यय नांदेड जिल्ह्यातील शेलगाव ता. अर्धापूर येथील ग्रामस्थांना आला आहे. गेल्या अनेक वर्षापासून स्मशानभूमी नसल्याने नागरिक त्रस्त होते. गतवर्षी नदीकाठी स्मशानभूमी मिळाली आहे. पण, मुसळधार पावसाने स्मशानभूमी पाण्याख्याली गेल्याने अंत्यसंस्कार कसे करावे ? हा प्रश्न शेलगावकरांना पडला. अखेर कमरे इतक्या पाण्यातून वाट शोधत भर रस्त्यावर मृत महिलेवर अंत्यसंस्कार करण्यात आले.
शेलगाव (बु) व (खु) या दोन्ही गावांना दरवर्षी पुराच्या पाण्याचा वेढा बसतो. आज तब्बल २४ तासांपासून गावकऱ्यांचा संपर्क तुटला आहे. चार दिवसात दोन वेळा पूर आल्याने शालेय विद्यार्थी, रुग्ण व शेतीची दळणवळणाची कामे सर्व व्यवहार ठप्प झाली आहेत. दरम्यान, तालुक्यातील शेलगाव येथील ५० वर्षीय महिला कमलबाई मारोती राजेगोरे यांचे मंगळवारी निधन झाले. मुसळधार पावसामुळे नदीकाठी असलेली स्मशानभूमी पाण्याखाली गेल्याने त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्याचा प्रश्न उभा राहिला. अखेर कमरे इतक्या पाण्यातून वाट काढत नातेवाईक आणि ग्रामस्थांनी मृत महिलेवर रस्त्यावर अंत्यसंस्कार केले.
अनेक नातेवाईक अंत्यविधीला मुकलेगावाला पुराने वेढा घातला असल्याने व पर्यायी रस्ता नसल्याने निकटवर्ती नातेवाईक अंत्यसंस्कारापासून मुकले आहेत. दरम्यान, पर्यायी रस्ता नसल्याने यापूर्वी अनेकांना योग्य वेळी उपचार मिळाले नाहीत. दरवर्षीच पावसाळ्यात अशा समस्या येत असल्याने पर्यायी रस्ता केंव्हा मिळणार? पूर परिस्थितीत फरफट केव्हा संपणार? असा सवाल शेलगावकर करीत आहेत.
रुंदीकरण करून पूल उभारावा रुग्णांसह शालेय विद्यार्थ्यांना पुराचा मोठा फटका बसत असून शासनाने शेलगाव बु.व खु. येथील नदीचे रुंदीकरण करावे.तसेच नदीवर मोठा पूल उभारावा.- उध्दवराव राजेगोरे, राष्ट्रवादी काँग्रेस ता.अध्यक्ष अर्धापूर