नांदेड: सैन्य भरतीत निवड झाल्यामुळे वैद्यकीय तपासणीसाठी आलेल्या एका २१ वर्षीय तरूणाचा मित्रांसोबत गोदापात्रात पोहत असताना बुडून मृत्यू झाला. ही घटना २३ मे रोजी दुपारी सव्वादोन वाजेदरम्यान विष्णूपुरी परिसरातील काळेश्वर मंदिराच्यामागील गोदावरी नदी पात्रात घडली. या दुर्दैवी घटनेने देश एका सैनिकाला मुकला आहे.
लोहा तालुक्यातील वाळकी खुर्द येथील रहिवासी संतोष पंडीतराव कदम ( २१ ) याची काही दिवसांपूर्वी सैन्यात निवड झाली होती. २३ मे रोजी विष्णूपुरी येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रूग्णालयात सैन्यात निवड झालेल्या तरूणांची वैद्यकीय तपासणी होती. यामुळे संतोष मित्रांसोबत विष्णूपुरी येथे आला. वैद्यकीय तपासणीनंतर दुपारी २ वाजेच्या दरम्यान संतोष मित्रांसोबत विष्णूपुरी परिसरातील श्री काळेश्वरांच्या मंदिरात दर्शनासाठी गेला.
दर्शनानंतर बाजूच्या गोदापात्रात सर्व मित्र पोहण्यासाठी उतरले. यावेळी पाण्याचा अंदाज न आल्याने संतोषचा बुडून मृत्यू झाल्याची माहिती मृत संतोषचे काका सुरेश शंकर कदम यांनी दिली असल्याचे ठाणे अंमलदार प्रविण केंद्रे व मदतनीस अंमलदार तुकाराम नागरगोजे यांनी सांगितले. या प्रकरणी प्रभारी पोलीस निरीक्षक लक्ष्मण राख यांच्या मार्गदर्शनाखाली हेड कॉन्स्टेबल माधव गवळी अधिक तपास करीत आहेत. मृत संतोषच्या पश्चात आई, वडील, एक भाऊ व बहिण असा परिवार आहे. दरम्यान, संतोषचे सैन्यात भरती होऊन देशसेवा करण्याचे स्वप्न अधुरे राहिल्याने वाळकी व कापशी गुंफा परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.