हदगाव (जि.नांदेड) : गावात स्मशानभूमी नसल्याने चक्क ताडपत्री झाकून अंत्यसंस्कार करावे लागल्याचा प्रकार तालुक्यातील भानेगाव तांडा गावात समोर आला आहे. गावात स्मशानभूमी नसल्याने ग्रामस्थांना अनेक समस्यांना सामोरे जावे लागते. पण, या समस्या प्रशासनाच्या कानी काही पोहोचत नाहीत. त्यामुळे वर्षानुवर्षांपासून परिस्थिती ‘ जैसे थे’ आहे. पण, पावसात चक्क ताडपत्री झाकून अंत्यसंस्कार करावे लागण्याच्या प्रकाराने या प्रश्नाची दाहकता समोर आली आहे.
हदगाव शहरापासून अवघ्या ४ कि.मी. अंतरावर भानेगाव तांडा आहे. गावाला जाण्यासाठी साधा रस्ताही नाही. स्मशानभूमी देखील नाही. २५ सप्टेंबर रोजी तालुक्यात जोरदार पावसाने हजेरी लावली. याच दिवशी गावातील एका वृद्धाचे निधन झाले. शेतात अंत्यविधी करण्याची तयारी सुरु झाली. पण, पाऊस थांबत नव्हता. त्यामुळे ग्रामस्थांची धावपळ उडाली. तेव्हा ताडपत्री झाकून लाकडाचा आधार देण्यात आला. त्यानंतर या वृद्धावर अंत्यसंस्कार करण्यात आले. गावात अनेक वर्षांपासून स्मशानभूमीची मागणी केली जात आहे. मात्र, लोकप्रतिनिधींसह अधिकाऱ्यांचेही याकडे दुर्लक्ष होत असल्याचा आरोप गावकऱ्यांकडून केला जात आहे.
चिखल तुडवत काढावी लागते अंत्ययात्रा
गावातील रस्त्यांची देखील दुरवस्था झाली आहे. रस्ता नसल्याने पावसाळ्यात चिखलातून अंत्ययात्रा काढावी लागते, असे रहिवाशांनी सांगितले. दीड हजार लोकवस्ती असलेल्या तांड्याला जाण्यासाठी साधा रस्ता नाही. आठ वर्षांपूर्वी रस्ता तयार केला होता. मात्र, त्याचे काम निकृष्ट दर्जाचे झाले. सध्या रस्त्याची अवस्था दयनीय आहे. येथील नागरिकांना शहरात येण्यासाठी चार कि.मी.ची पायपीट करावी लागते. रुग्णांना रुग्णालयात नेण्यासाठी जीव मुठीत घेऊन प्रवास करावा लागतो. रस्ता आणि स्मशानभूमीचा प्रश्न नाही सुटल्यास उपोषण करण्याचा इशारा ग्रामस्थांनी दिला आहे.