- सचिन मोहितेनांदेड : डोंगरमाथ्यावर असलेल्या जगदंबा तांडा या वस्तीला जाण्यासाठी पक्का रस्ता नसल्याने येथील ग्रामस्थांचे हाल होत आहेत. एका व्यक्तीचा मृतदेह चक्क झोळी करुन गावात आणावा लागल्याचा प्रकार समोर आला. त्याचा व्हिडिडो सध्या मोठ्या प्रमाणात व्हायरला होत आहे.
नांदेड जिल्ह्यातील किनवट तालुका हा दुर्गम भाग आहे. आदिवासी बहुल असलेल्या या तालुक्यात अनेक गावे आणि तांड्यावर पोहचण्यासाठी पक्का रस्ताच नाही. अंबाडी ग्रामपंचायतीच्या हद्दीत असलेल्या जगदंबा तांडा या वस्तीची अशीच अवस्था आहे. रात्री-अपरात्री वस्तीत येण्यासाठी मोठे हाल होतात. या वस्तीतील संतोष चव्हाण (४४) या युवकाचा ८ ऑगस्ट रोजी सकाळी ६ वाजता यवतमाळ येथे उपचारादरम्यान मृत्यू झाला. त्यानंतर अंत्यविधी करण्यासाठी संतोषचा मृतदेह जगदंबातांडा येथे आणण्यात आला. मात्र वस्ती माळरानावर डोंगरावर असल्याने व पक्का रस्ता नसल्याने मृतदेह झोळी करत वस्तीवासीयांनी गावात आणला.
या घटनेचा व्हीडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. या वस्तीला रस्ता नसल्याने मृतदेहाची होणारी हेळसांड या व्हीडिओ मधून उघड होत आहे. एव्हढेच नाही तर गंभीर रुग्णांना असेच बाजेवर न्यावे लागते. ही परवड थांबवण्यासाठी किमान आता तरी आम्हाला रस्ता करून द्या, असा आर्त टाहो जगदंबा तांडा येथल्या ग्रामस्थांनी फोडला आहे. गेल्या तीस वर्षांपासूनची ही वस्ती अंबाडी ग्रामपंचायतीच्या हद्दीत आहे. संतोष चव्हाण यांच्या पश्चात पश्चात पत्नी, दोन मुले असा परिवार आहे.