नांदेड- नांदेड प्रशासन कुठल्याही कार्यक्रमात राजशिष्टाचार पाळत नसल्याची गंभीर तक्रार नांदेड चे खासदार प्रताप पाटील चिखलीकर यांनी थेट लोकसभा अध्यक्षांकडे केली आहे. नांदेडचे प्रशासन कुणाचे तरी खाजगी नोकर असल्याप्रमाणे वागत असल्याची टीका चिखलीकरांनी पालकमंत्री अशोक चव्हाण यांचे नाव न घेता केली.
नांदेडमध्ये होणाऱ्या प्रत्येक शासकीय कार्यक्रमात खासदार प्रताप पाटील यांना डावलले जात आहे. कुठल्याही शासकिय कार्यक्रमाच्या निमंत्रण पत्रिकेवर खासदार चिखलीकरांचे नाव टाकले जात नाही. शासकीय उद्घाटनाच्या ठिकाणी कोनशिलेवर नाव टाकले जात नाही. खासदार म्हणून नाव टाकणे राजशिष्टाचार असताना चिखलीकरांना डावलले जात आहे. त्यामुळे खासदार चिखलीकरांनी थेट लोकसभा अध्यक्षांकडे लेखी तक्रार केली.
आपल्याला नांदेडच्या जनतेने खासदार केले पण जिल्हा प्रशासन अवहेलना करत असल्याने संसदेच्या हक्कभंग समितीकडे तक्रार खासदार चिखलीकरांनी केली. या तक्रारीची लोकसभा सचिवांनी गंभीर दखल घेत राज्य सरकारकडून माहिती मागवली आहे.