- शेख शब्बीर
देगलूर: शहरातील एका व्यापाऱ्याने आपल्या विश्वासू ड्रायव्हरला बँकेत पैसे भरण्यासाठी पाठविले असता संबंधित ड्रायव्हरने कट रचून याची टीप आपल्या साथीदारांना देऊन अज्ञात दोन चोरट्यांनी पैसे लुटून नेल्याचा बनाव केला. मात्र देगलूर पोलीसांनी तपासाची चक्रे फिरवून अवघ्या दोन तासांत यातील चोरट्यांच्या मुसक्या आवळत चोरीतील मुद्देमाल जप्त केला आहे.
शहरातील लाईन गल्ली येथील दाल मिल तथा खतांचे व्यापारी असलेले गणेश अचिंतलवार यांनी सोमवारी सकाळी मागील पंधरा वर्षापासून त्यांच्याकडे ड्रायव्हर असलेले त्यांचे विश्वासू कमलाकांत पांडुरंग नरबागे यांच्याकडे नेहमीप्रमाणे शहरातील एचडीएफसी बँकेत पैसे भरण्यासाठी सुमारे 26 लाख रुपयांची रोकड दिली. कार क्रमांक MH26 AC 5151 या कार मध्ये 26 लाख रुपयांची रोकड घेऊन बँकेकडे जात असताना शहरातील अत्यंत वर्दळीचे ठिकाण असलेल्या पाणी टाकीजवळ अंदाजे 10:15 वाजताच्या दरम्यान तोंडाला मास्क लावलेले दोन अज्ञात चोरट्यांनी मोटर सायकल क्रमांक MH 26 CG 9010 कारच्या समोर लावून कार थांबवली. कारच्या उजव्या बाजूला सीटवर ठेवलेली पैशाची बॅग हाताला हिसका देऊन पळवून नेली असल्याचे सदरील ड्रायव्हरने अचिंतलवार यांना सांगितले.
याप्रकरणी अचिंतलवार यांनी लागलीच देगलूर पोलीस स्टेशन गाठून घडलेला सर्व प्रकार पोलिसांना सांगितला असता देगलूर पोलीसांनी यातील ड्रायव्हर कमलाकर पांडुरंग नरबागे यास ताब्यात घेत घडलेल्या घटने विषयी त्याच्याकडून माहिती घेऊन घटना घडलेल्या परिसरातील सीसीटीव्ही फुटेज तपासले असता सदरील सीसीटीव्ही फुटेज मध्ये संबंधित चोरटे हे कैद झाले मात्र तपासा दरम्यान ड्रायव्हर कडून उडवा उडवी ची उत्तरे दिली जात असल्याने सदरील चोरी प्रकरणात ड्रायव्हरचा हात असल्याचा पोलिसांचा संशय बळावला. तसेच ड्रायव्हरच्या मोबाईलमधील कॉल डिटेल्स ही तपासले असता त्याचे घटना घडण्यापूर्वी अनेकदा अनोळखी नंबरवर बोलणे झाल्याचे दिसून आले. त्यामुळे ड्रायव्हरला पोलिसी खाक्या दाखविताच त्याने कट रचून आपल्या दोन साथीदारांना सोबत घेऊन हा प्रकार केल्याचे सांगितले.
लागलीच देगलूर पोलिसांनी यातील ड्रायव्हर आरोपी कमलाकांत पांडुरंग नरबागे ( राहणार सिद्धार्थ नगर देगलूर) यांच्यासह त्याचे साथीदार सचिन चंद्रकांत बकरे राहणार सिद्धार्थ नगर देगलूर, व चंद्रशेखर विठ्ठलराव मलकापूरे ( राहणार संघर्ष नगर देगलूर ) यांना ताब्यात घेत मुद्देमाल ही जप्त केला आहे. याप्रकरणी देगलूर पोलीस स्टेशन येथे कलम 392 भादवी 34 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.