- श्रीनिवास भोसलेनांदेड : लग्न घटिका जवळ आलेली... सततचा पाऊस अन नदीला आलेल्या पुर... लग्नविधीत विघ्न नको म्हणून नवरदेवासह वऱ्हाडातील सात - आठ मंडळींनी चक्क थर्माकोलच्या हुडीवरून जवळपास ७ किलोमीटरचा जलप्रवास करत लग्न स्थळ गाठले. काळजाचा ठोका चुकवणारा हा प्रवास चर्चेचा विषय बनला आहे. सुदैवाने यात कुठलीही जीवितहानी झाली नसून नवरदेव-नवरीला वेळेवर हळद लागली आणि इतर विधीही पार पडले. आज लग्नाचा मुहूर्त असून दोन्ही घरी लगीनघाई सुरू आहे.
हदगाव तालुक्यातील करोडी येथील शहाजी माधव राकडे हा तरूण इयत्ता आठवी पर्यंत शिकलेला आहे. घरी स्वतःची शेती नाही. तो आणि त्याचा परिवार मोल मजूरी करून जीवन जगतात. परीवारात आई वडील, भाऊ, दोन बहिणी असा परिवार आहे.
दरम्यान, शहाजी याचा विवाह उमरखेड तालुक्यातील संगम चिंचोली येथील नात्यातील गायत्री बालाजी गोंडाडे या मुलीशी महिण्यापुर्वी जुळला आहे. सोयरीक झाल्यानंतर १५ जुलै ही लग्नाची तारीख काढली. त्यानुसार वधू वराकडची मंडळी तयारीला लागली. लग्नाची खरेदी पुर्ण झाली होती. सर्व तयारी झाली, परंतु सततच्या पावसाने लग्न मुहूर्त टळतो की काय अशी भीती वधू-वराकडील मंडळीला वाटू लागली.
मागील चार पाच दिवसापासून नांदेड, हिंगोली आणि यवतमाळ जिल्ह्य़ात पैनगंगा आणि कयाधू नदी परिसरात अतिवृष्टी झाली. जिकडे तिकडे नदी नाल्यांना पूर आला. त्यामुळे रस्ते वाहतुक बंद पडली. एकमेकांचा संपर्क तुटला. नवरदेवाला गुरूवारी नवरीकडे जाऊन साखरपुडा, ओवसा, हळद हे कार्यक्रम वेळेवर पार पाडायचा होते. प्रवासाच्या वाटा बंद झाल्याने उमरखेड तालुक्यातील संगम चिंचोली येथे कसे जायचे असा प्रश्न वरमंडळींना पडला. संगम चिंचोली हे गाव पैनगंगा आणि कयाधु नदीच्या संगम स्थानावर आहे. त्यामुळे तिथली पुर परस्थितीचा सामना करावा लागणार ही बाब लक्षात घेऊन नवरदेव शहाजी राकडे यांनी आणि त्याच्या नातेवाईकांनी थर्माकॉलच्या हुड्यावरून नदीच्या मार्गाने पूरातून संगम चिंचोली ला जाण्याचा निर्णय घेतला. त्याप्रमाणे ७ किलोमीटरचा जल मार्गाने प्रवास पुर्ण करत गुरुवारी दोन तासात ते सुखरूप १२ वाजता संगम चिंचोलीत पोहचले. सर्व प्रवास जीवावर बेतनारा, काळजाचा ठोका चुकवनारा होता. परंतु तो पूर्ण करून नवरदेव सुखरूप पोहोचला. हळदीच्या दिवशी होणारे टीळा, ओवसा आदी विधी आटोपल्यावर नवरदेवा सोबत गेलेली पाहुणे मंडळी पुन्हा जलमार्गाने सुखरूप करोडी गावात पोहोचली.
आज लागणार लग्नसंगम चिंचोली येथे आज विवाह सोहळा संपन्न होणार आहे. शुक्रवारी सकाळी वऱ्हाडी मंडळी संगम चिंचोलीकडे लग्न सोहळ्यास निघण्याची तयारी करत आहे. नदीला आलेले पूराचे पाणी ओसरले तर वऱ्हाडी मंडळी वाहनाने जाणार आहेत. नसता जल मार्गाने प्रवास ठरलेला आहे. सध्या तरी दोन्ही कुटुंबात लगीनघाई सुरू असल्याचे सांगितले जाते.