महायुतीत भाजपला शह देण्यासाठी शिंदे सेनेला मागे टाकत राष्ट्रवादी काँग्रेसच्याअजित पवार गटाने पक्षप्रवेशाचा सपाटा सुरू केला आहे. ‘माजी’ आमदारांवर जाळे फेकून त्यांना पक्षात आणले जात आहे. मात्र, जिल्ह्यात भाजपकडे पाच विद्यमान आमदार असताना राष्ट्रवादीला केवळ ‘माजी’ आमदारांच्या बळावर खरोखरच बुस्ट मिळेल का? याची चर्चा होताना दिसते.
जिल्ह्यात राष्ट्रवादी काँग्रेसचे सुरुवातीपासूनच फार वर्चस्व नाही. प्रतापराव चिखलीकर आमदार झाल्याने लोहा व कंधार तालुक्यात राष्ट्रवादीला भाजपचे तयार नेटवर्क मिळाले. आता माजी खासदार भास्करराव खतगावकर आल्याने देगलूर-बिलोली या भागात ताकद वाढली. दिवंगत प्रदीप नाईक यांच्यामुळे किनवट या भागात राष्ट्रवादीची ताकद आहेच. इतर तालुक्यांमध्ये राष्ट्रवादी नामफलकापुरती आहे. आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत राष्ट्रवादीचा किती ‘इफेक्ट’ दिसेल हे वेळच सांगेन. या निवडणुका महायुतीत लढल्या जातात का, हा खरा प्रश्न आहे. महायुतीत लढले, तरी राष्ट्रवादीला ‘एकच आमदार’ असल्याने जागा वाटपात मर्यादा येतील. स्वबळावर लढल्यास पक्ष चार-पाच तालुक्यांच्या पुढे प्रभाव पाडू शकणार नाही, असे सध्याचे चित्र आहे. पक्ष आणि नेतृत्वाचा विचार केल्यास राष्ट्रवादी काँग्रेस आणि प्रतापराव चिखलीकर यांच्या तुलनेत भाजप आणि अशोकराव चव्हाण सरस ठरतात. राष्ट्रवादीचा डोळा कमकुवत झालेल्या काँग्रेसच्या मतांवर आहे. त्यासाठी नवाब मलीक यांचा चेहरा जाणीवपूर्वक पुढे करून इफ्तार पार्टी आयोजित केल्या जात आहेत. मात्र, भाजपच्या मांडीला मांडी लावून बसलेल्या राष्ट्रवादीकडे मुस्लीम मतदार जाईल का? याबाबत साशंकता आहे. मुस्लीम मतदारांचे नेहमीच काँग्रेसला प्राधान्य राहिले आहे. मस्साजोग येथील सरपंच संतोष देशमुख खून प्रकरणात राष्ट्रवादीने अखेरपर्यंत मंत्री धनंजय मुंडे यांचा बचाव केला. त्यामुळे मराठा समाजात आधीच राष्ट्रवादीबाबत नाराजीचा सूर आहे. राष्ट्रवादीने खतगावकर, पोकर्णा, गोजेगावकर, घाटे, रावणगावकर, हंबर्डे आदी ‘माजी’ मंडळी आपल्या पक्षात आणली. तर, भाजपकडे जिल्ह्यात एक-दोन नव्हे, तर तब्बल पाच ‘विद्यमान’ आमदार आहेत. सोबतीला राज्यसभेचे दोन खासदारही आहेत. त्यामुळे सतत होणाऱ्या पक्ष प्रवेशातून राजकीय समीकरणे बदलणार असली, तरी पक्षाला खरोखरच किती बुस्ट मिळेल, हे पाहणे महत्त्वाचे ठरेल. भाजप व काँग्रेसकडे कॅडरबेस कार्यकर्ते, मतदार आहेत. त्या तुलनेत जिल्ह्यात राष्ट्रवादीचे नेटवर्क मर्यादित आहे. काँग्रेसची मुस्लीम व्होट बँक फोडून राष्ट्रवादीकडे वळविण्यात प्रतापराव चिखलीकरांना किती यश मिळते यावर बरेच काही अवलंबून आहे.
...पण राष्ट्रवादी सशक्त होतेय!जिल्ह्यात विधानसभा निवडणुकीत नऊही जागा महायुतीने जिंकल्यामुळे आता स्ट्राँग विरोधक कोण? असा प्रश्न विचारला जात होता. पण, अल्पावधीतच महायुतीतील घटक पक्ष असलेली अजित पवारांची राष्ट्रवादीच सक्षम विरोधक म्हणून पुढे येते आहे. रविवारी नरसी येथे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीत पक्षप्रवेश सोहळ्यात आमदार प्रतापराव चिखलीकर, भास्करराव खतगावकर यांनी प्रत्यक्ष-अप्रत्यक्ष अशोकराव चव्हाण यांच्या विरोधात सूर आवळला. दोन विरोधक एकत्र आल्याने भविष्यात या दोघांचाही ‘चव्हाण विरोध’ आणखी वाढण्याची शक्यता आहे.
राष्ट्रवादीची गती शिंदेसेनेपेक्षा अधिकजिल्ह्यात शिंदे सेनेचे तीन-चार आमदार आहेत. मात्र एकच आमदार असूनही राष्ट्रवादीची पक्षप्रवेशाची गती शिंदेसेनेपेक्षा अधिक आहे. आपण विनाअट राष्ट्रवादीत गेल्याचे खतगावकर सांगत असले तरी या पक्षप्रवेशामागे स्नुषा डॉ. मिनल यांचे राजकीय पुनर्वसन हा छुपा अजेंडा आहेच. मात्र, राज्यपाल नियुक्त आमदारकी की मंडळ-महामंडळ हे स्पष्ट नाही.
अशोकरावांना विरोधाची नवलाई नाहीमाजी मुख्यमंत्री अशोकराव चव्हाण यांना अशा विरोधाची आता नवलाई राहिलेली नाही. प्रतापराव चिखलीकर यांनी अनेक वर्षे प्रखर विरोधकाची भूमिका वठविली आहे. मध्यंतरी अशोकराव भाजपात आल्यानंतर ‘नाईलाजाने का होईना’ दोघांनाही जुळवून घ्यावे लागले. चेहऱ्यावर मनोमिलनाचे उसणे हास्य आणावे लागले. पण विधानसभेच्या तोंडावर संधी मिळताच प्रतापराव भाजपातून बाहेर पडले. राष्ट्रवादीची घड्याळ हाती बांधत पुन्हा विरोधक म्हणून उभे ठाकले. प्रतापरावांचा मुलगा राष्ट्रवादीच्या होर्डींगवर झळकतो आहे. मात्र मुलीच्या राष्ट्रवादी प्रवेशासाठी अद्याप वेटींग असल्याचे दिसते. महायुतीत असूनही प्रतापरावांच्या विरोधाची धार बोथट होण्याऐवजी आणखी टोकदार होत आहे.
शिंदेसेना छुप्या विरोधातच ‘समाधानी’शिंदे सेनेचे दोन आमदार अशोकरावांच्या विरोधात असले तरी ते सहसा उघड विरोध टाळतात. छुप्या विरोधावरच त्यांचे राजकारण सुरू आहे. प्रतापराव मात्र दंड थोपटून अशोकरावांशी उघड पंगा घेतात. विरोधी पक्ष कॉंग्रेसमध्ये आता खासदार रवींद्र चव्हाण हेच एकमेव प्रमुख नेतृत्व शिल्लक आहे. मात्र त्यांच्या विरोधाला धार येण्यास आणखी काही अवधी लागेल. उद्धव सेना आणि राष्ट्रवादीच्या शरद पवार गटात, तर सामसूम आहे. या गटातून कोणताही विरोध कुठेही झळकताना दिसत नाही. अजित पवारांच्या राष्ट्रवादीत नेतृत्वावरून खटके उडू नयेत म्हणजे झालं. कारण, प्रतापराव पक्षाचे एकमेव सिटिंग आमदार असले तरी जिल्ह्याच्या राजकारणात खतगावकरांना ते ‘ज्युनिअर’ आहेत. प्रकृती अस्वस्थ व वयोमानाचा विचार करता खतगावकर घरी बसून तर चिखलीकर ऑन फिल्ड राहून पक्षाचे काम करतील, असे दिसते.
हवेचा अंदाज चुकला कसा?‘काँग्रेसमध्येच राहा’ ही कुटुंबातील विनंती धुडकावून खतगावकर राष्ट्रवादीत गेले आहेत. आपल्याला हवेचा नेहमीच अंदाज येतो, असे खतगावकरांनी भाषणात सांगितले. त्यावेळी यापूर्वी दोनवेळा पक्षांतर करताना खतगावकरांना अंदाज आला नाही का, हा अंदाज न आल्यानेच डॉ. मिनल यांचे राजकीय नुकसान झाल्याची कुजबुज उपस्थितांमधून ऐकायला मिळाली.