- गोकुळ भवरेकिनवट (जि.नांदेड) : दोन कार घेऊन शस्त्रासह आलेल्या चोरट्यांनी एका जुगार अड्ड्यावर लाखो रुपयांची लुटमार केली आहे. पिस्तुलीतून एक फायर करुन जुगाऱ्यांना एका खोलीत डांबून ठेवत चोरटे तेथून पसार झाले. मंगळवारी रात्री किनवट येथे घडलेल्या या प्रकाराची सध्या शहरात जोरदार चर्चा सुरु आहे.
किनवट ते माहूर या राष्ट्रीय महामार्गाच्या पूर्वेला एका शेतात अनाधिकृतरित्या जुगार अड्डा चालतो. अनेक दिग्गज त्या ठिकाणी जुगार खेळण्यासाठी येतात. विशेषत: चारचाकी आणि दुचाकी गाड्यांची नेहमीच गर्दी असते. मंगळवारी सकाळपासून शहरात रिपरिप पाऊस सुरु होता. सायंकाळी साडेपाच ते सहा वाजण्याच्या सुमारास दहा ते बारा शस्त्रधारी चोरटे या ठिकाणी आले. प्रथम त्यांनी पिस्तुलातून एक राऊंड झाडला. उपस्थितांचे मोबाइल हस्तगत केले. एक रुमाल खाली टाकून त्यामध्ये पैसे, दागिणे जमा करण्यास सांगितले. अंगावरचे सोनेही काढून घेतले. त्यानंतर चोरट्यांनी सर्व जुगाऱ्यांना एका खोलीत डांबून तेथून पळ काढला. या घटनेत लाखो रुपयांची रक्कम लांबविल्याची चर्चा आहे. घटनेने परिसरात खळबळ उडाली आहे.
दोन वाहनाने आले...दहा ते बारा चोरटे दोन वाहनाने या ठिकाणी आले होते. त्यांच्याकडे तलवारी, बंदुका आणि अन्य शस्त्र होते, अशी चर्चा आहे. या घटनेची किनवट शहरात जोरदार चर्चा होत आहे.
अफवा आहे, अजून तक्रार नाही या घटनेच्या संदर्भात पोलिस निरीक्षक दीपक बारसे यांना घटनेविषयी विचारले, असता अफवा सुरु आहे. आमच्याकडे अजून तक्रार आली नाही. तक्रार आली तर कारवाई केली जाईल, असे त्यांनी सांगितले.
नागरिकांत भितीचे वातावरणकिनवट पोलिसांनी परवाच्या दिवशीच गुन्हेगारी टोळीचा पर्दाफाश करीत दोघांना अटक केली. अन्य चोरट्यांचा शोध सुरु आहे. त्यातच ही घटना घडल्याने नागरिकांत भितीचे वातावरण निर्माण झाले आहे.