हिमायतनगर : राज्याच्या सिमेवर असलेल्या रजनी गावातून आलेल्या तेलंगनातील तस्करांनी वन विभागाच्या पथकाची कुणकुण लागताच एक घन मीटर सागवान जागीच सोडून त्या ठिकाणाहून धूम ठोकली आहे. पथकाने हे सागवान जप्त केले आहे.
तेलंगना राज्यातील रजनी गावातील आठ ते दहा तस्कर बैलगाडी घेऊन सागवानाची झाडे तोडत असल्याची माहिती वनपरिक्षेत्र अधिकारी बालाजी चव्हाण व त्यांच्या पथकाला मिळाली. त्यावरुन ५ सप्टेंबर रोजी रात्री १०.३० वाजण्याच्या सुमारास वन विभागाचे पथक घटनास्थळी दाखल झाले. वनपरिक्षेत्र अधिकारी बालाजी चव्हाण व कर्मचारी रजनी गावाजवळ असलेल्या तलावाच्या बाजूला थांबले. मात्र सागवान तस्करांना वन विभागाचे पथक आले असल्याची कुणकुण लागली.
काही वेळानंतर आरोपींनी सागवानाची लाकडे भरलेली बैलगाडी त्याच ठिकाणी सोडून पोबारा केला. पथकाने ३५ हजार रुपये किंमतीचे १ घनमीटर सागवान आणि बैलगाडी जप्त केली आहे. ही कारवाई वनपरिक्षेत्र अधिकारी बालाजी चव्हाण यांच्यासह वनपाल डी.डी. विभुते, अमोल कदम,मेटकर, व्ही.बी. चाटसे, रमाकांत वाघमारे, सोने, गिते, केंद्रे, अमृतमार, पवार, अहमद यांनी केली.