- गोविंद टेकाळेअर्धापूर (जिल्हा नांदेड) : नांदेड-नागपूर राष्ट्रीय मार्गावर असना पुलावर दुचाकीवरून जाणाऱ्या बाप-लेकाचा समोरुन भरधाव वेगात आलेल्या ट्रकच्या धडकेत जागीच मृत्यू झाला. आज ( शुक्रवारी दि.१५) सकाळी सहा वाजेच्या सुमारास ही दुर्दैवी घटना घडली. दाजीबा शंकरराव गाढे ( वय ६५ वर्षे ), गोपीनाथ दाजीबा गाढे ( वय ४० वर्षे ) अशी मृतांची नावे आहेत.
अर्धापूर तालुक्यातील भोगाव येथील दाजीबा शंकरराव गाढे यांना मोठा मुलगा गोपीनाथ दाजीबा गाढे हे आपल्या वडीलांना (कॅन्सरवर उपचार सुरू होते) तपासणीसाठी नांदेड येथील खाजगी रुग्णालयात घेऊन जात होते. दोघेही शुक्रवारी सकाळी नेहमीप्रमाणे नांदेड येथे दुचाकीवरून जात होते. दरम्यान, असना पुलावर नांदेड - अर्धापूर मार्गे भरधाव जाणाऱ्या आयचरची ( क्रमांक एम.एच.४५ ए.ई-८८११ ) त्यांच्या दुचाकीला समोरासमोर जोराची धडक झाली. या भीषण अपघातात ६५ वर्षीय दाजीबा गाढे हे असना पुलावरून ४५ ते ५० फुट उंचीवरून खाली पडले. तर मुलगा गोपीनाथ गंभीर जखमी झाला.
सदर अपघाताची माहिती मृत्युंजय दुत गोविंद टेकाळे यांनी महामार्ग पोलिस यांना दिली. राजकुमार व्यवहारे, राजीव धाडवे, नईम शेख, रविंद्र साकरकर, जसप्रीत शाहू, वसंत शिनगारे, नरेंद्राचार्य महाराज संस्थानचे रुग्णवाहिका चालक राजू पाचंगे व विमानतळ पोलीस यांनी घटनास्थळी धाव घेऊन मदत केली. जखमींना तात्काळ शासकीय रुग्णालय नांदेड येथे दाखल केले असता डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले. सर्वसामान्य शेतकरी कुटूंबातील दोघाही कर्त्या पितापूत्राचा अपघातात दुर्देवी मृत्यू झाल्याने गाढे कुटुंबियांवर दुःखाचा डोंगर कोसळला असून या घटनेने तालुक्यात हळहळ व्यक्त होत आहे.