नांदेड: पोटाची खळगी भरण्याकरिता उत्तरप्रदेशातून कामाच्या शोधात नांदेड येथे आलेल्या दोन मजुरांना भरधाव टिप्परने चिरडल्याची घटना बुधवारी ( दि. २३) रात्री पावणेबारा वाजेच्या सुमारास विष्णूपुरी परिसरातील घडली. शिवकुमार राजभर (वय-४२ वर्षे, रा. अमहरा ता. रसडा जि. बलीया) व मनोजकुमार मनता (वय-३०, रा. शिवराबहादूरगंज ता. काशमाबाद जि. गाजीपुर) अशी मृतांची नावे आहेत. तर भरत जयनारायण राजभर (वय- २८, रा. राजापूर, ता. मोहम्मदाबाद जि. गाजीपुर, उत्तर प्रदेश) हा मजूर गंभीर जखमी झाला आहे.
उत्तर प्रदेशातील तीन मजूर सेंट्रींगचे काम करण्यासाठी १६ मार्च रोजी दिल्ली येथून नांदेडकडे निघाले. दिल्लीहून निघालेले मजूर १८ मार्च रोजी सकाळी नांदेड येथे पोहोचले. हे तिघेजण कामाच्या शोधात नांदेड शहर व परिसरातच फिरत होते. दरम्यान, भरत जयनारायण राजभर, शिवकुमार शिवगोविंद राजभर व मनोज कुमार मनता हे तिघेजण २३ मार्च रोजी रात्री पावणेबारा वाजेच्यादरम्यान, नांदेड ते लातूर राष्ट्रीय महामार्गावरील 'असर्जन' नाक्यापासून रस्त्याच्या डाव्या बाजूनेच 'विष्णूपुरी'कडे पायी जात होते.
विष्णूपुरी रस्त्यावरील गुरूद्वारासमोर गेले असता, पाठीमागून लातूर फाटा येथून वाडी पाटीकडे भरधाव वेगात जाणाऱ्या (एमएच- ४०, वाय-३५७७) टिप्परने तिघांना उडवले. यात शिवकुमार राजभर (वय-४२ वर्षे, रा. अमहरा ता. रसडा जि. बलीया) व मनोजकुमार मनता (वय-३०, रा. शिवराबहादूरगंज ता. काशमाबाद जि. गाजीपुर) हे दोघेजण गंभीर जखमी झाले. तसेच भरत राजभर हे देखील जखमी झाले.
दरम्यान, टिप्परचालकाने रुग्णवाहिका बोलावून जखमींना शासकीय रूग्णालयात दाखल केले. मात्र, डॉक्टरांनी तपासून शिवकुमार राजभर व मनोजकुमार मनता यांचा मृत्यू झाल्याचे घोषित केले, अशी माहिती पोलीस ठाणे अंमलदार तथा सपोउपनि. ज्ञानोबा गिते यांनी दिली. याप्रकरणी भरत जयनारायण राजभर (वय- २८, रा. राजापूर, ता. मोहम्मदाबाद जि. गाजीपुर, उत्तर प्रदेश) यांनी नांदेड ग्रामीण ठाण्यात दिलेल्या तक्रारीआधारे आरोपी टिप्पर चालकाविरूध्द गुन्हा नोंदविण्यात आला. प्र. पो. नि. अशोक घोरबांड यांचे मार्गदर्शनाखाली पोउपनि. महेश कोरे तसेच पोलीस नाईक सुनील गटलेवार हे याप्रकरणाचा अधिक तपास करीत आहेत.