नांदेड- मराठवाडा मुक्ती दिनी प्रशासनाचा निषेधार्थ नांदेडमधील धानोरा मक्ता येथिल गावकऱ्यांनी अनोखे आंदोलन केले. गावकऱ्यांनी रस्ता आणि पुलाची मागणी करत नदी पात्रात सामुहिक राष्ट्रगीत गायले. या अनोख्या आंदोलनाची सोशल मिडीयावर चर्चा सुरु आहे.
लोहा तालुक्यातील धानोरा मक्ता ते गांधी नगर रस्ता तसेच गावातील नदीवर पूल बांधण्याची गावकऱ्याची मागणी आहे. नदीवर पूल नसल्याने पावसाळ्यात नदी पात्रातून गावकऱ्यांना, विद्यार्थ्यांना जीवघेणा प्रवास करावा लागतो. गेल्या दहा वर्षांपासून मागणी करूनही शासन प्रशासन लक्ष देत नाही. त्यामुळे शासनाचा निषेध म्हणून आज मराठवाडा मुक्ती दिनी गावकऱ्यांनी हे अनोखे आंदोलन केले.
तर नदीपात्रात करणार उपोषण या आंदोलनाची दखल घेण्यात आली नाही तर मागण्या पूर्ण करण्यासाठी पुन्हा आंदोलन करण्यात येईल. येत्या दोन ऑक्टोबर रोजी गांधी जयंती दिनी याच नदी पात्रात उपोषण करण्याचा इशारा गावकऱ्यांनी दिला आहे.