जिल्ह्यात चार दुचाकी चोरीला
जिल्ह्यात दुचाकी चोरीचे चार गुन्हे दाखल झाले आहेत. वजिराबाद हद्दीत हिंगोली गेट येथे नारायण गजानन भंगे, नांदेड ग्रामीणमध्ये गंगा सिटी येथून आजीश जन मॅथीव यांची सिडको भागात शैलेश गंगाधर शिंदे आणि हिमायतनगर येथे म्हसोबाच्या नाल्याजवळून पुंडलिक माधव कदम यांची दुचाकी चोरीला गेली.
बाजारातून व्यापाऱ्यांचा मोबाईल लांबविला
भगतसिंघ रस्त्यावर भरलेल्या आठवडे बाजारात भाजीपाला खरेदी करताना व्यापाऱ्याचा १० हजार रुपयांचा मोबाईल लांबविण्यात आला. दारासिंग हरिसिंग रामगडीया असे व्यापाऱ्याचे नाव आहे. या प्रकरणात इतवारा ठाण्यात गुन्हा नोंद झाला.
हडको बाजारातून चोरट्यांचा धुडगूस
हडको बाजारात मोबाईल चोरट्यांनी धुडगूस घातला असून विशाल यादव सोनकांबळे यांचा १० हजार रुपये किमतीचा मोबाईल लांबविला. ही घटना १३ जून रोजी घडली. या प्रकरणात नांदेड ग्रामीण पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद झाला.
सुरक्षारक्षकाच्या मुलाला पळविले
देगलूर शहरातील आदित्य वेअर हाऊस येथे सुरक्षारक्षक असलेल्या जगन्नाथ तुकाराम पतंगवाड यांचा मुलगा महेश पतंगवाड याला पळवून नेण्यात आले. ही घटना १२ जून रोजी घडली. चुलत्याच्या घरी जातो म्हणून तो घराबाहेर पडला होता. या प्रकरणात पोलिसांनी गुन्हा नोंदविला.
वाघोबाच्या खारीत जुगार अड्डा
मुखेड तालुक्यातील वाघोबाच्या खारीत सुरु असलेल्या जुगार अड्ड्यावर पोलिसांनी धाड मारली. १४ जून राेजी ही कारवाई करण्यात आली. यावेळी तीन हजार रुपये जप्त करण्यात आले असून मुखेड पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद झाला.
सर्पदंशाने शेतकऱ्याचा मृत्यू
लोहा तालुक्यातील मौजे टेकळी येथील मुंजाजी धोंडिबा जिंकलवाड हे सध्या कंधार तालुक्यातील शेकापूर येथे राहत होते. १३ जून रोजी रात्री त्यांच्या हाताला विषारी सापाने चावा घेतला. उपचारासाठी कंधार येथील रुग्णालयात दाखल केले असता त्यांचा मृत्यू झाला.