शहरातून तीन दुचाकी लांबविल्या
शहरातील भाग्यनगर, इतवारा आणि नांदेड ग्रामीण पोलीस ठाण्याच्या हद्दीतून चोरट्यांनी तीन दुचाकी लंपास केल्या आहेत. जगदीश गंगाधर शेटकर यांची दुचाकी भाग्यनगर, मोईन अहमद रज्जाक यांनी डॉ. शेख रब्बानी यांच्या रुग्णालयासमोर दुचाकी उभी केली होती. तर सिडको येथून आनंद कोंडीबा कंजाळकर यांची दुचाकी चोरट्याने लांबविली.
चंदनाचे झाड चोरण्याचा प्रयत्न
एसटी वर्कशॉप भागात असलेले चंदनाचे झाड चोरण्याचा प्रयत्न करण्यात आला. ही घटना २ सप्टेंबर रोजी घडली. वकॅशॉप येथे २५ हजार रुपये किमतीचे चंदनाचे झाड आहे. या प्रकरणात सुरक्षारक्षक चंद्रकांत नामदेव हणमंते यांच्या तक्रारीवरून भाग्यनगर पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद झाला.
झोपेत असताना मोबाइल लांबविला
किनवट तालुक्यातील गोकुंदा येथे अर्धवट बांधकाम झालेल्या घरात एका तरुणाचा मोबाइल आणि रोख रक्कम असा २० हजारांचा ऐवज लंपास करण्यात आला. ही घटना १ सप्टेंबर रोजी घडली.
मंगाजी गोविंद गादेकर यांचे पंचशीलनगर भागात घराचे बांधकाम सुरू आहे. त्यामुळे घराला दरवाजे नाहीत. १ सप्टेंबर रोजी ते या घरात झोपले होते. या वेळी चोरट्याने टेबलवर ठेवलेला १५ हजार रुपये किमतीचा मोबाइल आणि रोख पाच हजार रुपये लंपास केले. या प्रकरणात किनवट पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद झाला.
नेकलेस राेडवर जुगार अड्डा
शहरातील देगलूर नाका भागात नेकलेस रोडवर सुरू असलेल्या जुगार अड्ड्यावर पोलिसांनी धाड मारली. या वेळी दीड हजार रुपये जप्त करण्यात आले. ४ सप्टेंबर रोजी ही कारवाई करण्यात आली. या प्रकरणात इतवारा पोलिसांनी गुन्हा नोंद केला. तर नांदेड ग्रामीण हद्दीत महावीर चौक येथे ३७ हजार रुपयांची देशी दारू पकडण्यात आली. अवैध विक्रीसाठी ही दारू नेण्यात येत होती.