नांदेड : जुन्या नांदेडातील होळी प्रभागात दलित वस्ती निधीतून केल्या जाणार्या पाणीपुरवठ्याच्या कामासाठी चोरीचे पाईप वापरले जात असल्याच्या संशयावरुन इतवारा पोलिसांनी १४ पाईप जप्त केले आहेत. त्याचवेळी या सर्व कामाची माहितीही महापालिका प्रशासनाकडे मागितली आहे.
मनपाच्या दलित वस्ती निधीतून जवळपास ३० लाखांचे पाणीपुरवठ्याचे काम होळी येथे सुरु आहे. या कामाचे उद्घाटन लोकप्रतिनिधींच्या हस्ते झाले. त्यानंतर काही दिवस काम झाले असता या कामासाठी वापरले जाणारे पाईप हे चोरीचे असल्याची बाब इतवारा पोलिसांना मिळाली. या माहितीवरुन पोलिसांनी खडकपुरा येथील शेख अब्दुल्ला अजीज शेख मुस्तफा याला ताब्यात घेतले. प्रारंभी शेख अब्दुल्ला अजीज याने हे पाईप आपलेच असल्याचे सांगितले. पोलिसांनी पाईपाचे देयक व इतर बाबींचे स्पष्टीकरण मागितले असता तो उडवाउडवीची उत्तरे देत होता. अखेर पोलिसी खाक्यानंतर एका व्यक्तीने त्याला ते पाईप आणण्यास सांगितल्याचे त्याने कबूल केले. शेख अब्दुल्ला अजीज याला पाईप आणण्यास सांगणारा तो कोण होता , याचा तपास पोलीस करीत आहेत.
दरम्यान, हा सर्व प्रकार महापालिका प्रशासनाने मात्र अगदी सहजतेने घेतला आहे. मंगळवारी दुपारपर्यंत पाणीपुरवठा विभागाच्या वरिष्ठ अधिकार्यांना या प्रकाराबाबत कोणतीच माहिती नव्हती. माध्यमांनी विचारले असता असा काही प्रकार घडलाच नाही, असे सांगण्यासही अधिकार्यांनी मागे-पुढे पाहिले नाही. मात्र सर्वच माहिती दिल्यानंतर सदर काम सुरु असल्याचे सांगितले. तसेच या कामावरील पाईप हे योग्यरितीने आणल्याचा दावाही पाणीपुरवठा विभागाच्या अधिकार्यांनी केला होता. सायंकाळनंतर मात्र या प्रकाराबाबत बोलण्याचे टाळले.
इतवारा पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक अनिल गायकवाड यांनी सदर पाईपप्रकरण संशयास्पद असल्याचे सांगितले. ताब्यात घेतलेल्या शेख अब्दुल्ला अजीज याने प्रारंभी उडवाउडवीची उत्तरे दिली. नंतर मात्र हे पाईप निर्मलहून आणल्याचे सांगितले. या प्रकरणी निर्मल पोलिसांनाही माहिती देण्यात आली असून निर्मल पोलीस हे पाईप नेमके कुठून आणले, याबाबत तपास करीत असल्याचे सांगितले. त्याचवेळी महापालिकेकडेही सदर ठिकाणी पाणीपुरवठा विभागाचे काम सुरु आहे काय? या कामाच्या निविदा काढल्या का?, टेंडर कोणाला दिले या सर्व बाबींची माहिती मागितल्याचे गायकवाड म्हणाले.
पाणीपुरवठा विभागाने केले हात वर पाणीपुरवठा विभागाने मात्र या प्रकरणात हात वर केले असून काम पाहणारे उपअभियंता रफतउल्ला खान यांनी या प्रकरणात आपल्याला काहीही माहीत नसल्याचे सांगितले. काम सुरु असताना कामावरील पाईप पोलिसांनी जप्त केले ही बाब माहिती नसणे आश्चर्यकारक आहे. त्याचवेळी संबंधित प्रकरणात माहिती दडपली जात आहे का? असा प्रश्नही पुढे आला आहे. त्यामुळे या सर्व प्रकाराची आता पोलीस विभाग कसून चौकशी करीत आहे. महापालिकेला पोलिसांनी सदर कामाबाबत विचारलेल्या माहितीचे नेमके उत्तर काय जाते, याकडे लक्ष लागले आहे.