कंत्राटींचे उपोषण मागे
भोकर : थकीत वेतनासाठी कंत्राटी कर्मचारी प्रवीण बसवंते यांनी पालिकेसमोर उपोषण सुरू केले होते. मुख्याधिकाऱ्यांच्या आश्वासनानंतर ते मागे घेण्यात आले. सात महिन्यांपासून बसवंते यांचा पगार थकवण्यात आला होता. मात्र, पगार न मिळाल्यामुळे त्यांनी उपोषण सुरू केले. मुख्याधिकारी प्रियंका टोंगे यांनी याकामी मध्यस्थी करून थकीत वेतनासंदर्भात अहवाल प्राप्त होताच देयक दिले जातील, असे आश्वासन दिले.
दोन बैलांची चोरी
लोहा : माळेगाव शिवारातील एका आखाड्यावरून ८० हजार रुपये किमतीच्या दोन बैलांची चोरी झाली. संतोष धुळगंडे यांनी आपल्या शिवारातील आखाड्यावर दोन बैल बांधून ठेवले होते. चोरट्यांनी ते चोरून नेले. माळाकोळी पोलिसांनी या घटनेची नोंद घेतली आहे.
भोसीकर यांचा सत्कार
कंधार : राष्ट्रवादी काँग्रेसच्या संपर्क कार्यालयात राष्ट्रवादी ओबीसी सेलच्या वतीने ग्रामीण जिल्हाध्यक्ष हरिहरराव भोसीकर यांचा सत्कार करण्यात आला. अध्यक्षस्थानी दिगंबर पाटील, तर प्रमुख पाहुणे म्हणून प्रदेश सरचिटणीस ॲड. अंगद केंद्रे, माजी सभापती बापुजी गौड, आनंदराव किडे, व्यंकटराव गायकवाड, महंमद तनवरोद्दीन, सय्यद अमीन उपस्थित होते. यावेळी उपस्थितांची भाषणे झाली. कार्यक्रमास अशोक मानसपुरे, संभाजी चिवडे, माधव विभुते, हणमंतराव खेडकर, रमेश ठाकूर, कालिदास मस्तापुरे, बी.आर. बनसोडे, भगवानराव नाईकवाडे, रामराव पेटकर, बालाजी कस्तुरे उपस्थित होते.
आरोग्य तपासणी शिबिर
अर्धापूर : राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या वतीने अर्धापूरमध्ये महाआरोग्य शिबिर घेण्यात आले. प्रमुख पाहुणे म्हणून अल्पसंख्याक जिल्हाध्यक्ष डॉ. मुजाहीद खान, कार्याध्यक्ष ॲड. सचिन जाधव, पदवीधरचे जिल्हाध्यक्ष सचिन देशमुख, युवक तालुकाध्यक्ष चंद्रकांत टेकाळे, संदीप राऊत उपस्थित होते. यात रक्तदाब, मधुमेहासारख्या आरोग्याची तपासणी करण्यात आली. कार्यक्रमासाठी शेख बशीर, रियाज फारुखी, शेख मुस्ताक यांनी परिश्रम घेतले.
निधी संकलनाची बैठक
बोधडी : राष्ट्रीय स्वयंसेवक संघ, विश्व हिंदू परिषदेच्या वतीने २० डिसेंबर रोजी बोधडी येथील विठ्ठलेश्वर मंदिरात रामजन्मभूमी निधी संकलनाची बैठक घेण्यात आली. यावेळी ४२ गावांतून रामभक्त उपस्थित होते. मंदिर बांधकामासाठी सढळ हाताने मदत करावी, असे आवाहन यावेळी करण्यात आले.
तरुणास मारहाण
भोकर : तालुक्यातील हळदा येथे दुचाकीच्या कारणावरून एका तरुणास मारहाण करण्यात आल्याची घटना घडली. रायखेड येथील गंगाधर मंचलवाड यांनी त्यांची मोटारसायकल वापरण्यासाठी त्यांच्या मित्राला दिली होती. १७ डिसेंबर रोजी मंचलवाड हे हळदा येथे गेले असता आरोपीने त्यांना मारहाण केली. तपास पो.ना. कदम करीत आहेत.
दुचाकी चोर वाढले
कंधार : शहर व परिसरात दुचाकी चोरीचे प्रमाण वाढले आहे. चोरांचा बंदोबस्त करावा, अशी मागणी भाजपचे शहराध्यक्ष ॲड. गंगाप्रसाद यन्नावार यांनी पोलिसांकडे केली. घरासमोर लावलेले वाहन चोरीस जाण्याचे प्रकार वाढले. एकाही घटनेचा तपास लावण्यात पोलिसांना यश आले नाही.
वैकुंठ रथाचे लोकार्पण
हदगाव : तामसा येथील तेली समाजाच्या वैकुंठ रथाचे लोकार्पण ज्येष्ठ नागरिक विश्वंभरराव देशमुख यांच्या हस्ते झाले. वैकुंठ रथाचा उपयोग नाममात्र देणगीच्या माध्यमातून करता येणार असल्याचे संतोष ठमके यांनी स्पष्ट केले. यावेळी सुरेश देशमुख, दीपक देशमुख, साहेबराव देशमुख, चंद्रकांत देशमुख, आकाश देशमुख आदी उपस्थित होते.