प्रसूती होतेय पुरुष डॉक्टरांच्या निगराणीखाली
कासराळी - लोहगावसह तालुक्यातील पाचही प्राथमिक आरोग्य केंद्रांत स्त्रीरोग व प्रसूतीसाठी वैद्यकीय अधिकारीच नाहीत, तर बिलोलीच्या ग्रामीण रुग्णालयात जागा भरलेली असूनसुद्धा येथे डॉक्टर उपस्थित राहत नाहीत, अशी माहिती समोर आली आहे. ज्यामुळे स्त्रियांच्या आरोग्याकडे दुर्लक्ष होत आहे. एकीकडे महिला सक्षमीकरणाच्या नावाने कोट्यवधींची उधळण होते, तर दुसरीकडे महिलांच्या आरोग्याकडे असे दुर्लक्ष केले जात आहे.
बिलोली तालुक्यातील कासराळी लोहगाव प्राथमिक आरोग्य केंद्रांतर्गत येते. स्त्रीरोग व प्रसूतीसाठी तज्ज्ञ महिला डाॕॅक्टरच या प्राथमिक आरोग्य केंद्रात नाही. पुरुष डाॕॅक्टरांकडून प्रसूती केली जाते. महिलांचा हा काळ आढेवेढ न घ्यायचा असला तरी पुरुष डॉक्टरांकडून प्रसूतीचा संकोच काही प्रमाणात केला जातो. मग प्रसूतीच्या हो-नाही या परिस्थितीत एखाद्या महिलेला विलंब झाल्यास जीव गमावण्याची शक्यताही नाकारता येत नाही. तीन वर्षांत कासराळीत २ गर्भवती महिलांचा आडून मृत्यू झाला, हे वास्तव आहे. कासराळीहून ६ कि.मी. अंतरावर असलेल्या इकडे बिलोली येथील ग्रामीण रुग्णालयात डॉ. सतीश तोटावार, डॉ. शेळके, डॉ. ललिता शुष्कर असे तीन अधिकृत वैद्यकीय अधिकारी आहेत. यापैकी येथील स्त्रीरोग व प्रसूतीतज्ज्ञ असलेल्या डॉ. ललिता शुष्कर या नांदेड येथे पदभार स्वीकारल्यापासूनच प्रतिनियुक्तीवर गेल्याने बिलोलीच्या ग्रामीण रुग्णालयातसुद्धा प्रसूती व स्त्रीरोगतज्ज्ञ महिला वैद्यकीय अधिकारीच नाही. येथे दोन डॉक्टरांवरच कारभार चालतो. ही परिस्थिती तालुक्यातील पाचही प्राथमिक आरोग्य केंद्रांत आहे. येथे प्रसूती व स्त्रीरोगांसाठी महिला डॉक्टरच नसल्याने स्त्रियांचे आजार वाढण्याची शक्यता आहेच.
बिलोली तालुक्यातील लोहगाव ४१६६३, सगरोळी २३५७६, खतगाव २१७२०, रामतीर्थ २०८७६, कुंडलवाडी २९८८४ अशी लोकसंख्यानिहाय प्राथमिक आरोग्य केंद्रे आहेत. शिवाय जवळपास २२ हजारहून अधिक लोकसंख्या असलेल्या बिलोली शहरातील ग्रामीण रुग्णालयात स्त्रीरोग व प्रसूतीसाठी महिला डॉक्टर नसल्याने मोठी अडचण होते. तालुक्याची दीड लाखाहून अधिक लोकसंख्या असताना स्त्रीरोग व प्रसूतीसाठी महिला डॉक्टरच नाहीत.
कोट
प्रतिनियुक्तीवर गेलेल्या डॉक्टरांच्या कायम नियुक्तीची मागणी वरिष्ठांकडे आठ दिवसांपूर्वीच केली आहे - डॉ. नागेश लखमावार (वैद्यकीय अधीक्षक), ग्रामीण रुग्णालय, बिलोली