संपूर्ण जिल्ह्यात केवळ लोहा तालुक्यातच दुष्काळ आहे काय?
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 13, 2019 12:19 AM2019-05-13T00:19:53+5:302019-05-13T00:21:32+5:30
जिल्हा दुष्काळाने होरपळून निघत आहे. जिल्ह्यातील अनेक तालुक्यांमध्ये तीव्र पाणीटंचाई निर्माण झाली आहे. परंतु, राजकीय पर्यटनासाठी ज्यांनी केवळ लोहा तालुक्याचा दुष्काळी दौरा केला त्यांना जिल्ह्यात इतर तालुक्यातील दुष्काळ दिसला नाही काय? दुष्काळ फक्त लोहा तालुक्यात आहे काय? असा प्रश्न काँग्रेसच्या आजी-माजी आमदारांनी केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले यांना केला आहे.
नांदेड : जिल्हा दुष्काळाने होरपळून निघत आहे. जिल्ह्यातील अनेक तालुक्यांमध्ये तीव्र पाणीटंचाई निर्माण झाली आहे. परंतु, राजकीय पर्यटनासाठी ज्यांनी केवळ लोहा तालुक्याचा दुष्काळी दौरा केला त्यांना जिल्ह्यात इतर तालुक्यातील दुष्काळ दिसला नाही काय? दुष्काळ फक्त लोहा तालुक्यात आहे काय? असा प्रश्न काँग्रेसच्या आजी-माजी आमदारांनी केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले यांना केला आहे.
केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी लोहा तालुक्यातील सुनेगाव तलावासह काही गावांना भेटी देऊन दुष्काळाची पाहणी केली. राजकीय पर्यटनाच्या निमित्ताने का होईना त्यांनी लोहा तालुक्याला भेट दिली, ही बाब जरी चांगली असली तरी लोहा तालुक्याप्रमाणेच जिल्ह्यातील मुखेड, देगलूर, नायगाव, बिलोली, भोकर, उमरी, धर्माबाद या तालुक्यालासुद्धा दुष्काळाच्या तीव्र झळा सोसाव्या लागत आहेत. जिल्ह्यात गंभीर दुष्काळ असताना शासनाचे मात्र याकडे पूर्ण दुर्लक्ष आहे.
केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले नांदेड जिल्ह्याच्या दौऱ्यावर आले. या ठिकाणी आल्यानंतर त्यांनी लोहा तालुक्यातील काही गावांनाच भेटी दिल्या. याऐवजी थोडी तसदी घेवून त्यांनी संपूर्ण जिल्ह्यातील दुष्काळ परिस्थितीचा आढावा घेणे अपेक्षित होते.
त्यासोबतच इतर तालुक्यांतील काही दुष्काळग्रस्त गावांना भेटी देवून दुष्काळ निर्मूलनासाठी उपाययोजना करण्याच्या सूचना प्रशासनास देणे गरजेचे होते. हे करण्याऐवजी आठवले यांनी मात्र लोहा तालुक्यात केवळ पर्यटन केले काय? असा सवाल काँग्रेसच्या आजी-माजी आमदारांनी केला आहे. नांदेड दौºयावर आलेल्या रामदास आठवले यांनी मोदी यापुढे थापा मारणार नाहीत असे म्हटले. याचाच अर्थ यापूर्वी मोदींनी केवळ थापाच मारल्या. नरेंद्र मोदी थापाडे आहेत हेच जणू त्यांच्या विधानातून सिद्ध होते.
निवडणूक निकाल लागण्याआधीच गुडघ्याला बाशिंग बांधलेल्या भाजपा उमेदवाराच्या लग्नाला रामदास आठवले यांनी उपस्थिती लावण्याची घाई करु नये. २३ मे च्या निकालाची वाट पहा. असा आततायीपणा करण्याची सवय भाजप उमेदवाराप्रमाणे आठवले यांनाही लागली असल्याचा टोला आ. वसंतराव चव्हाण, आ. अमिताताई चव्हाण, माजी आ. हणमंतराव पा. बेटमोगरेकर, माजी आ. रावसाहेब अंतापूरकर, पीआरपीचे राज्य उपाध्यक्ष बापूराव गजभारे यांनी लगावला आहे.
पालकमंत्री अद्याप जिल्ह्यात फिरकलेच नाहीत
निवडणुकीच्या आचारसंहितेच्या नावाखाली सरकार सर्वपक्षीय बैठका घेत नव्हते. परंतु आता आयोगाने महाराष्ट्राची आचारसंहिता दुष्काळावर निर्णय घेण्यासाठी शिथिल केली आहे. असे असतानासुद्धा जिल्ह्याचे पालकमंत्री नांदेडमध्ये आले नाहीत. या जिल्ह्यातील जनतेचे हाल काय होत आहेत, याकडे शासन गांभीर्याने पाहत नाही.दुष्काळ निवारणासाठी पालकमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली तात्काळ बैठक घेणे आवश्यक आहे.