नांदेड : शिवसेना नेते रामदास कदम ( Ramdas Kadam ) सेनेवर ( Shiv Sena ) नाराज नाहीत असे स्पष्टीकरण त्यांचा मुलगा युवा सेना प्रदेश कार्यकारिणीचे सदस्य सिद्धेश कदम ( Siddhesha Kadam ) यांनी दिले. यापुढे युवकांना संधी मिळावी असे त्यांचे मत आहे, तसेच यापुढे ते कोणतेही पद घेणार नाहीत, कोणतीही निवडणूक लढविणार नाहीत असेही सिद्धेश कदम यावेळी म्हणाले (Ramdas kadam remains Shiv Sainik always) . ते युवा सेना मेळाव्यानिमित्त नांदेडमध्ये होते.
कडवट शिवसैनिक, माजी मंत्री, माजी विधान परिषद नेते अशा अनेक जबाबदाऱ्या पार पडलेल्या रामदास कदम यांना स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीत पुन्हा उमेदवारी देण्यात आली नाही. यामुळे विधान परिषद निवडणुकीत पुन्हा संधी न मिळाल्याने रामदास कदम नाराज असल्याची चर्चा सुरु आहे. रामदास कदम अपक्ष निवडणूक लढतील असेही बोले जात होते. मात्र, या सर्व चर्चा केवळ अफवा असल्याचे त्यांचा मुलगा सिद्धेश कदम यांनी म्हटले आहे. रामदासभाई नाराज नाहीत, राजकारणात आता युवकांना संधी मिळावी असे त्यांचे मत आहे. यापुढे रामदासभाई कुठलेही पद घेणार नाहीत, निवडणूक लढवणार नाहीत, असे सिद्धेश यांनी स्पष्ट केले. तसेच कदम कुटुंबाच्या खांद्यावर मरेपर्यंत सेनेचा झेंडा असेल असेही सिद्धेश कदम यावेळी म्हणाले. यामुळे रामदार कदम सेनेवर नाराज आहेत, ते सेना सोडतील या चर्चांना आता पूर्ण विराम मिळाल्याचे राजकीय अभ्यासकांचे मत आहे.
रामदास कदम यांच्याऐवजी सुनील शिंदे यांनी उमेदवारी स्थानिक स्वराज्य संस्थेमधून येत्या १० डिसेंबर रोजी माजी मंत्री रामदास कदम यांच्या रिक्त होणाऱ्या मुंबईच्या जागेवर शिवसेनेतून वरळीचे माजी आमदार सुनील शिंदे यांनी उमेदवारी देण्यात आली आहे. शिवसेनापक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी सुनील शिंदे यांच्या नावावर शिक्कामोर्तब केले. शिवसेना नेते, खासदार संजय राऊत यांनी सुनील शिंदे यांच्या उमेदवारीचे समर्थन केले आहे. संजय राऊत म्हणाले की, सुनील शिंदे हे मागील विधानसभा निवडणुकीपूर्वी विद्यमान आमदार होते. युवा सेना प्रमुख आदित्य ठाकरे यांनी निवडणूक लढवण्याचा निर्णय घेतल्यानंतर सुनील शिंदे यांनी ही जागा त्यांच्यासाठी सोडली होती. त्याशिवाय, सुनील शिंदे यांनी अनेक वर्ष पक्षासाठी काम केले आहे. त्यांच्या या पक्षकार्याची आणि केलेल्या त्यागाचे स्मरण ठेवून विधान परिषदेसाठी उमेदवारी दिली असल्याचे संजय राऊत यांनी स्पष्ट केले आहे.