उमरी : ग्रामपंचायत निवडणुकीच्या मतदान प्रक्रियेत सेवा बजावणाऱ्या शासकीय कर्मचाऱ्यांच्या मतदानासंदर्भात निवडणूक विभागाने ठोस निर्णय घेतलेले नाहीत. त्यामुळे त्यांना मतदान करणे शक्य होणार नाही.
मतदानाचा हा हक्क ग्रामपंचायत निवडणुकीच्या निमित्ताने हिरावला जात आहे. अशी भावना कर्मचारी वर्गात आहे. कारण तालुकाअंतर्गत ड्यूटीवर असणारे कर्मचारी तालुक्यात पोस्टल मतदान करू शकतील. मात्र, ५०-६० ते १०० किलोमीटर अंतरावर बाहेरच्या तालुक्यात असणारे कर्मचारी मात्र आपल्या गावाकडे मतदान करू शकणार नाहीत, अशी परिस्थिती समोर येत आहे. याबाबत बऱ्याच कर्मचाऱ्यांनी संबंधित तहसीलदारांकडे लेखी अर्ज करून कळविले. ९ जानेवारी रोजी दुसऱ्या प्रशिक्षणाच्या दिवशी याबाबत निर्णय घेण्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले होते. मात्र, अद्याप त्याबाबत कसलाच ठोस निर्णय झालेला नाही. त्यामुळे आता अनेक कर्मचारी मतदानापासून वंचित राहणार आहेत, हे स्पष्ट झाले.