नांदेड : लोहा नगर परिषदेसाठी सुरू असलेली प्रचाराची रणधुमाळी शनिवारी सायंकाळी थांबली. रविवारी येथे मतदान होणार असून यानिमित्ताने शहरात मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. दरम्यान, या निवडणुकीत नगराध्यक्षपदासाठी ४ तर नगरसेवकपदासाठी ५४ उमेदवार आपले नशीब आजमावत असून सोमवारी मतमोजणी होणार आहे.नगराध्यक्षपदासह १८ जागांसाठी होऊ घातलेल्या निवडणुकीत २८ मतदान केंद्र तयार करण्यात आले आहेत. या मतदान केंद्रावर २८ केंद्राध्यक्ष, १२० कर्मचारी यांची नियुक्ती केली आहे. शहरात शांतता व सुव्यवस्था अबाधित रहावी मतदान शांततेत पार पडावे यासाठी पोलीस विभागाकडून मोठा फौजफाटा शहरात तैनात करण्यात आला आहे. या यात विभागीय पोलीस अधिकारी रमेश सरोदे, पोलीस निरीक्षक बालाजी मोहिते यांच्या नेतृत्वाखाली ५० पोलीस अधिकारी, राज्य राखीव दल, केंद्रीय पोलीस दल, पोलीस कर्मचारी, महिला होमगार्ड असा ७५० पोलीस कर्मचाऱ्यांचा बंदोबस्त तैनात आहे. निवडणुकीच्या काळात शांतता रहावी म्हणून शहरात दोन दिवसांपासून पथसंचलन करण्यात आले.दरम्यान, मतदारांना मतदान करण्यासाठी रविवार, ९ डिसेंबर रोजी सुटी अथवा दोन तासांची सवलत देण्याबाबत उद्योग, ऊर्जा व कामगार विभागाच्या परिपत्रकान्वये सूचना देण्यात आल्या आहेत. निवडणूक मतदानक्षेत्रात मतदार असलेले कामगार, अधिकारी, कर्मचारी, यांना मग ते कामानिमित्त निवडणूक होणा-या क्षेत्राबाहेर कार्यरत असले तरी, त्यांना निवडणुकीच्या दिवशी मतदानाचा हक्क बजावण्यासाठी भरपगारी सुटी देण्यात यावी. ही सुटी उद्योग, ऊर्जा व कामगार विभागांतर्गत येणा-या सर्व आस्थापना, कारखाने, दुकाने इत्यादींना लागू राहील. अपवादात्मक परिस्थितीत पूर्ण दिवस सुटी देणे शक्य नसेल तर मतदान क्षेत्रातील कामगारांना मतदानाचा हक्क बजावण्यासाठी सुटीऐवजी दोन ते तीन तासांची सवलत देण्यात यावी.मात्र त्याबाबत त्यांनी संबंधित महानगरपालिका आयुक्त अथवा जिल्हाधिकारी यांची पूर्वपरवानगी घेणे आवश्यक राहील. कोणत्याही परिस्थितीत मतदारांना मतदानासाठी किमान दोन ते तीन तासांची सवलत मिळेल, याची दक्षता आस्थापना मालकांनी घेणे आवश्यक राहील. या आदेशाच्या अंमलबजावणीची सूचना जिल्हाधिका-यांनी दिल्या आहेत़काँग्रेसचेभाजपासमोर तगडे आव्हानलोहा नगरपालिकेत भाजपा, काँग्रेस, शिवसेना, राष्ट्रवादी, बहुजन आघाडीसह अपक्ष उमेदवार निवडणुकीत आपले नशीब आजमावत असले तरी येथे काँग्रेसने भाजपासमोर तगडे आव्हान उभे केल्याचे चित्र आहे़ आ.प्रताप पाटील चिखलीकर यांनी लोह्याची सत्ता जिंकण्यासाठी जोरदार मोर्चेबांधणी केली असली तरी काँग्रेसने ही निवडणूक प्रतिष्ठेची केली आहे़ शुक्रवारी झालेल्या काँग्रेसच्या सभेला लोहावासियांचा मोठा प्रतिसाद लाभला होता. याबरोबरच कार्यकर्त्यांची मोट बांधून त्यांना प्रभागनिहाय जबाबदारी दिल्याने लोह्यात काँग्रेस वरचढ ठरत असल्याचे चित्र आहे़ दरम्यान, निवडणुकीच्या अनुषंगाने लोह्यात पोलिसांनी चोख बंदोबस्त ठेवला असून मतदानासाठी प्रशासनही सज्ज झाले आहे़
लोह्यात प्रचाराच्या तोफा थंडावल्या
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 09, 2018 12:00 AM