कंधार : शहरासह ग्रामीण भागात पंतप्रधान प्रगती योजनेतंर्गत कुष्ठरोग शोधमोहीम राबविण्यात आली. संशयित रुग्णांची तपासणी केल्यानंतर नवीन २३ रुग्ण आढळून आल्याचे समोर आले आहे. मागील दोन वर्षांपेक्षा यावर्षी संख्येत वाढ झाली आहे. पाच प्रा. आ. केंद्रात २३ संख्या असून एकट्या बारुळ केंद्रांतर्गत सर्वाधिक ८ तर पेठवडज केंद्रांतर्गत ७ रूग्ण असल्याचे समोर आले आहे. आता आरोग्य विभागासमोर कुष्ठरोग निर्मूलनाचे मोठे आव्हान आहे.शहरासह तालुक्यात २४ सप्टेंबर ते ९ आॅक्टोबर या कालावधीत पंतप्रधान प्रगती योजनेतंर्गत कुष्ठरोग शोधमोहीम राबविण्यात आली. त्यासाठी नोंदणी करत तपासणीचे विशिष्ट उद्दिष्ट ठेवण्यात आले होते. शहरात ४ हजार ७६० रूग्ण तपासणी केली होती. डॉ. वन्नलवार यांच्या नेतृत्वाखाली व श्री शिवाजी कॉलेज, कंधारचे प्राचार्य डॉ.जी.आर.पगडे, कार्यक्रमाधिकारी प्रा.डॉ. माधव कदम यांच्या सहकार्याने महाविद्यालयीन विद्यार्थी, स्वयंसेवक, वैद्यकीय अधीक्षक डॉ. जीवन पावडे यांच्या मार्गदर्शनाखाली पर्यवेक्षक आशिष भोळे, राजेंद्र वाघमारे यांनी शोध मोहीम राबविली. त्यात २३ जण संशयित आढळले.योग्य व अचूक तपासणी २१ जणांची करण्यात आली. त्यात एकही नवीन रूग्ण आढळला नाही. २ जणांची तपासणी ते बाहेरगावी गेल्याने होऊ शकली नाही असे सांगण्यात आले. मागील वर्षी एक नवीन रूग्ण आढळला होता.
- ग्रामीण भागात मात्र उलट चित्र दिसून आले आहे. कुरूळा प्रा.आरोग्य केंद्रांतर्गत ५१ संशयित रूग्ण आढळले होते. तपासणीनंतर नवीन एकही रूग्ण आढळला नसल्याचा अहवाल समोर आला आहे. पानशेवडी प्रा.आ. केंद्रांतर्गत ८८ संशयितात नवीन ५, पेठवडज केंद्रांतर्गत ६४४ संशयितांपैकी ७ व उस्माननगर केंद्रांतर्गत ९७ संशयितांपैकी नवीन ३ रूग्ण आढळले.
- तालुक्यातील बारूळ प्रा.आ. केंद्रांतर्गत ८४ संशयित रूग्ण होते. त्यात नवीन ८ रूग्ण आढळले आहेत. ही सर्वाधिक मोठी व लक्षणीय संख्या आहे. मागील वर्षी या केंद्रांतर्गत २ रूग्ण आढळले होते. त्या तुलनेत यावर्षी आढळलेली संख्या चारपट अधिक आहे. बारूळनंतर पेठवडज ७ ही संख्या आहे.
- कुष्ठरोगाचे वर्गीकरण असांसर्गिक व सांसर्गिक असे केले जाते.त्यानुसार उस्माननगरमधील ३ नवीन रूग्णांत १ असांसर्गिक व सांसर्गिक २ असल्याचे समजते. पानशेवडी ५ मधील ३ असांसर्गिक व २ सांसर्गिक, पेठवडज ७ मधील ३ असांसर्गिक व ४ सांसर्गिक आणि बारूळ मधील ८ रूग्णात ७ असांसर्गिक व १ सांसर्गिक रूग्ण असल्याचे अहवालात नमूद करण्यात आले आहे. असांसर्गिक रूग्णांवर ६ महिने औषधोपचार केला जातो आणि सांसर्गिक रूग्णांवर १२ महिने उपचार केला जातो. कुष्ठरोग शोधमोहीम राबवून तपासणी करण्यासाठी तालुका आरोग्य अधिकारी डॉ.एस.पी.ढवळे यांच्या मार्गदर्शनाखाली सर्व वैद्यकीय अधिकारी, विस्तार अधिकारी एस.एम.अली, कुष्ठरोग तंत्रज्ञ, आरोग्य कर्मचारी आदींनी परिश्रम घेतले.
- नवीन २३ कुष्ठरोगाचे रूग्ण आढळल्याने आरोग्य विभागासमोर या रोगाचे निर्मूलन करून तो हद्दपार करण्याचे मोठे आव्हान आहे. बहुविध औषधोपचार करून दूर करण्यासाठी प्रयत्न केले जातील. कुष्ठरोगाचे समूळ उच्चाटन कधी होणार, याची प्रतीक्षा आहे.