नांदेड : 'विनाकारण माझ्यावर काहीही आरोपकरून पाचजण मला त्रास देत आहेत. त्यांच्या त्रासाला कंटाळून मी आत्महत्या करत आहे. पोलिसांनी त्यांना अटक करून शिक्षा करावी', अशा आशयाचा व्हिडिओ मोबाईलमध्ये करत एका २४ वर्षीय तरुणाने गळफास घेऊन २९ नोव्हेंबरला आत्महत्या ( Young man commits suicide due to threats from his girlfriend's relatives) केल्याची घटना बिलोली तालुक्यातील तोरणा गावात घडली. भागेश्वर नरवाडे असे मृत तरुणाचे नाव असून प्रेयसीच्या नातेवाईकांच्या त्रासाला कंटाळून त्याने आत्महत्या केल्याची तक्रार मृताच्या वडिलांनी दिली आहे.
बिलोली तालुक्यातील तोरणा येथील तरुण भागेश्वर नरवाडे हा जीप चालक आहे. तो नांदेड येथील सिडको भागात जीप चालवत असे. तेथेच नातेवाईकाकडे तो राहत असे. दरम्यान, नातेवाईकांच्या घरासमोर राहणाऱ्या मुलीसोबत त्याचे प्रेमसंबंध निर्माण झाले. यातून दोघेही घरातून पळून केले. प्रेयसीच्या नातेवाईकांनी गुन्हा दाखल केल्यानंतर भागेश्वरला अटक करण्यात आली होती. दोन महिन्यांपूर्वी जामीन मिळाल्यापासून तो गावाकडे राहत असे.
गावाकडे असताना प्रेयसीच्या काही नातेवाईकांनी धमक्या दिल्याने मला जगण्याची इच्छा नसल्याचे भागेश्वर याने वडिल नारायण यांना सांगितले. यावरून वडील आणि काकाने त्याची समजूत काढली. दरम्यान, २९ नोव्हेंबरला वडील नारायण हे एका लग्न समारंभासाठी बाहेर गावी गेले. घरात एकटा असलेल्या भागेश्वर याने गळफास घेत आत्महत्या केली. लग्न समारंभ झाल्यानंतर नारायण नरवाडे घरी आल्यानंतर त्यांना मुलाने आत्महत्या केल्याचे निदर्शनास आले. दरम्यान, भागेश्वर त्याने मोबाईलमध्ये एक व्हिडीओ तयार करत बालाजी काटवडे, गोंविंद कराड, गजानन काटवडे, अविनाश सोनावणे, मारुती कोडामंगले यांना आत्महत्येस जबाबदार ठरवले. यावरून त्यांनी शंकरनगर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. यावरून बालाजी काटवडे, गोंविंद कराड, गजानन काटवडे, अविनाश सोनावणे, मारुती कोडामंगले यांच्या विरोधात गुन्हा दाखल झाला असून पोलीस अधिक तपास करत आहेत.
काय आहे व्हिडिओत :''माझ्या मरणाला पाचजण कारणीभूत आहेत. बालाजी काटवडे, गोंविंद कराड, गजानन काटवडे, अविनाश सोनावणे, मारुती कोडामंगले यांच्या त्रासामुळे मी फाशी लावून घेत आहे. पोलीस प्रशासनाला विनंती आहे की, त्यांनी या पाच जणांना अटक करावी, त्यांना शिक्षा करावी, त्यांना कळावे मला काय त्रास झाला आहे. पोलिसांनी माझ्या घरच्यांना काही बोलू नये, या पाच जणांनी विनाकारण केलेल्या आरोपांमुळे मी आत्महत्या करत आहे.'', अशा आशयाचा व्हिडीओ भागेश्वर याने मोबाईलमध्ये रेकॉर्ड केला आहे.