नांदेड- ठाकरे गटाचे खा.संजय राऊत यांनी विधीमंडळ नसून चोरमंडळ आहे असे वक्तव्य केले. या वक्तव्याचा खास चारोळीच्या स्टाईलमध्ये केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांनी समाचार घेतला. ते नाहीत चोर, संजय राऊतने करु नये शोर, असे म्हणत त्यांनी कोण चोर आहेत अन् कोण तुरुंगात जाऊन आले हे सर्वांना माहित आहे असा टोला लगाविला.
दलित पँथरच्या सुवर्ण महोत्सवी वर्षानिमित्त नांदेडात आयोजित कार्यक्रमासाठी बुधवारी आठवले आले होते. यावेळी ते म्हणाले, ठाकरे यांना सोडून गेलेले ते चाळीस आमदार हिम्मतवाले आहेत. न्यायालयाचा निर्णयही त्या आमदारांच्या बाजूनेच लागेल. शिवसेना ही शिंदेचीच आहे. ठाकरे यांना आता शिवसेना नाव आणि चिन्हही वापरता येणार नाही. ही वेळ स्वताहा ठाकरे आणि संजय राऊत यांनी ओढावून घेतली. युतीत निवडणुका लढवून त्यांनी भाजपला आणि आम्हाला धोका दिला. कवाडे हे शिंदे गटात गेल्याबाबत आम्हाला नाराजी नाही. परंतु एकवेळेस आमच्याशी चर्चा करण्याची गरज होती. राज ठाकरे यांना सोबत घेण्यास मात्र आमचा विरोध आहे. मी इथे असताना राज ठाकरेंची काही आवश्यकता नाही. विनाकारण जास्त गर्दी करुन उपयोग नाही. अशी मिष्कील टिपणीही त्यांनी केली.
वंचितचा प्रभाव पडणार नाही वंचितचे प्रकाश आंबडेकर हे ठाकरे गटासोबत गेले. त्याचा फायदा आम्हालाच होणार आहे. मी जेव्हा गेलो होतो तेव्हाच त्यांनी यायला पाहिजे होते. मुंबई महापालिका निवडणुकीतही वंचितचा फारसा प्रभाव पडेल असे वाटत नाही. फार तर अकोला जिल्ह्यात फायदा होवू शकतो असेही आठवले म्हणाले. यावेळी यावेळी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडीयाचे कार्याध्यक्ष बाबूराव कदम, गौतम सोनवणे, विजय सोनवणे, महानगराध्यक्ष धम्मपाल धूताडे यांची उपस्थिती होती.