नवीन नांदेड: अज्ञात चोरट्यांनी रेडिमेड कपड्याच्या गोदामाचे शटर तोडून गोदामामधील शुट, शेरवानी, ब्लेजर, जिन्स व लहान मुलांचे ड्रेस असे एकूण सुमारे २७ ते २८ लाख रूपयांचा माल चोरून नेला. ही घटना १७ मार्च रोजी सकाळी अकराच्या सुमारास नांदेडच्या 'एमआयडीसी' परिक्षेत्रात उघडकीस आली.
पोलीस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, नांदेडच्या 'एमआयडीसी' परिक्षेत्रातील डिजॉन कॅज्युअल्स प्रा.लि.चे मालक, व्यवस्थापक तसेच नोकर व कर्मचारी नेहमीप्रमाणे १६ मार्च रोजी सायंकाळी गोदाम आणि किरकोळ विक्रीचे दुकान बंद करून घरी गेले. दरम्यान, तोंडाला कापड बांधून आलेल्या अज्ञात चोरट्यांनी १७ मार्च रोजी पहाटे सव्वातिन ते सव्वाचार वाजेचेदरम्यान, गोदामाचे पाठीमागील शटर वाकवून आत प्रवेश केला. चोरट्यांनी गोदामात तब्बल एक तासभर थांबून शुट, शेरवानी, ब्लेजर, जिन्स व लहान मुलांचे रेडिमेड ड्रेस आणि काउंटरमधील रोख ५०० रुपये चोरून नेले. कपड्यांची किंमत जवळपास २७ ते २८ लाख रूपये असल्याची माहिती मालक दीपक प्रेमचंदाणी तसेच व्यवस्थापक खान इरफानअली यांनी दिली. या घटनेची माहिती समजताच डीवाय.एसपी. डॉ. सिध्देश्वर भोरे, प्रभारी पोलीस निरीक्षक अशोक घोरबांड, 'डीबी' अर्थातच गुन्हे शोधपथकाचे पोउपनि. शेख असद, पोउपनि. गणेश होळकर व त्यांचे अन्य सहकारी पोलीस कर्मचारी घटनास्थळी आले.
विशेष बाब म्हणजे, चोरट्यांनी प्रारंभी गोदामातील सीसीटीव्हीचे वायर तोडून दोन संगणकही चोरून नेले आहेत. याप्रकरणी मुख्य व्यवस्थापक खान इरफान अली अजीज खान यांनी नांदेड ग्रामीण पोलीस ठाण्यात दिलेल्या तक्रारीच्याआधारे गुन्हा नोंदविण्याची प्रक्रिया सुरू असल्याची माहिती ठाणे अंमलदार ज्ञानोबा गिते व मदतनीस महिला पो. कॉ. ज्योती आंबटवार यांनी दिली.